तुळजा भवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत मंदिर प्रशासन व भोपे पुजारी मंडळात वाद; नवीन शिखर व गाभाऱ्यावरून मतभेद, न्यायालयात जाण्याची शक्यता.
सायली मेमाणे
पुणे २५ जुलै २०२५ : Dharashiv News : तुळजा भवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. तुळजापूर येथील प्रसिद्ध व ऐतिहासिक तुळजा भवानी मंदिरातील नवीन शिखर आणि गाभाऱ्याच्या दुरुस्तीवर भोपे पुजारी मंडळाने आक्षेप घेतला असून, त्यांनी थेट न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली आहे.
या संदर्भात मंदिर प्रशासन आणि भोपे पुजारी मंडळ यांच्यात मतभेद तीव्र होण्याची शक्यता असून, श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तुळजा भवानीच्या मंदिरातील विकास कामं सुरू असताना, गाभाऱ्यातील जुने टाईल्स काढले गेले आणि त्यावेळी काही शिळांना तडे गेल्याचं निदर्शनास आलं. भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने या तडे गेलेल्या शिळांना लोखंडी खाब्यांचा आधार दिला आहे. यासंदर्भात राज्य पुरातत्व विभागाला पाहणी अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली होती. तसेच, भारतीय पुरातत्व विभाग (ASI) दिल्ली येथूनही पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले गेले.
आता मंदिर प्रशासनाने नवीन गाभारा आणि शिखर उभारण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्यावर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक होणार आहे. मात्र, भोपे पुजारी मंडळ यास तीव्र विरोध दर्शवत आहे. त्यांच्या मते, गाभाऱ्याचे आणि शिखराचे पाडकाम हे हिंदू धर्मशास्त्रविरोधी असून मंदिर म्हणजे केवळ वास्तू नाही, तर ते देवीचे घर आहे — श्रद्धेचे स्थान आहे.
भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर कदम परमेश्वर यांनी स्पष्टपणे सांगितले की, मंदिर पाडण्याचा घाट घालणं म्हणजे पैशांचा अपव्यय असून श्रद्धाळूंमध्ये संभ्रम निर्माण करण्यासारखे आहे. मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी मंदिर संस्थानावर असून त्यांचे पाऊल चुकीच्या दिशेने असल्याचे त्यांनी नमूद केले.
सध्या ASI चा अहवाल राज्य पुरातत्व विभागाकडे प्राप्त झाला असून तो लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर मुंबईमध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेऊन यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
⛔️ तुळजा भवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या आणि शिखराच्या दुरुस्तीवरून निर्माण झालेला वाद आता गंभीर वळण घेत आहे. पुरातत्व विभाग, मंदिर संस्थान आणि भोपे पुजारी मंडळ यांच्यातील संवादातूनच याचे समाधान शोधणे आवश्यक आहे. अन्यथा, हे प्रकरण थेट न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter