पुणे, 22 जुलै 2025 – महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एका शेतकऱ्याने व्यक्त केलेला संदेश सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. “काम करणाऱ्या मंत्र्यांना काम करू द्या” अशी मागणी करणाऱ्या या शेतकऱ्याच्या मताला अनेकांचे पाठबळ लाभत आहे.
या संदेशात शेतकऱ्याने कोकाटेंच्या कार्यशैलीचा गौरव करताना म्हटले आहे की, “माणिकराव कोकाटे हे कृषी विकासासाठी झपाटून काम करणारे मंत्री आहेत. त्यांनी ज्या ‘कृषी समृद्धी’ योजनेची नुकतीच घोषणा केली आहे, त्यामध्ये दरवर्षी ₹5000 कोटींचा खर्च आणि पाच वर्षांत ₹25,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. ही योजना केवळ घोषणाबाजी नसून, कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरू शकते.”
या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, कोकाटेंनी आजवर ५२ धोरणात्मक शासन निर्णय घेतले असून, हे निर्णय प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी त्यांनी नियमित बैठका, सूचना आणि वेळेवर निधी वाटपाच्या माध्यमातून प्रशासनाला सक्रिय केले आहे.
“माणिकराव कोकाटे हे फक्त मंत्री नाहीत, तर ‘शेतकऱ्यांचे मंत्री’ आहेत. त्यांची स्पष्टवक्तेपणा ही पारदर्शकतेची खूण आहे, पण काही राजकीय विरोधक त्याचं विपर्यास करून वैयक्तिक टीका करत आहेत,” असेही या संदेशात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित केला जातो — राजकारणाच्या खुंटीवर काम करणाऱ्या मंत्र्यांची बदनामी का केली जाते? विरोधकांनी मुद्दामून मंत्र्यांविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? असा संशय व्यक्त होत आहे.
शेतकऱ्याच्या भावना पुढे मांडताना संदेशात म्हटले आहे की, “शेतकऱ्यांच्या आडून राजकारण थांबवावे. जो मंत्री मनापासून काम करत आहे, त्याला थांबवू नका, त्याला बळ द्या.”
राज्यभरातील अनेक शेतकरी आणि नागरिक या मताशी सहमत असल्याचे सोशल मीडियावर उमटत आहे. राजकारण बाजूला ठेवून, कार्यक्षम नेतृत्वाला साथ देणं हेच योग्य, असा सूर आता जनतेतून उमटतो आहे.