पुणे विमानतळावर कस्टम्स विभागाची मोठी कारवाई; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून 10.5 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. NDPS अंतर्गत गुन्हा दाखल; आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा संशय.
सायली मेमाणे
पुणे २६ जुलै २०२५ : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाने २४ जुलै २०२५ रोजी मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून सुमारे १०.५ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. प्रवाशाकडे एकूण १०.४७ किलो हायड्रोपोनिक वीड आढळून आला असून, याचे आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांत असल्याचे कस्टम्स अधिकाऱ्यांनी सांगितले. इंडिगो फ्लाइट 6E-1096 ने आलेल्या या प्रवाशाच्या संशयास्पद वागणुकीमुळे त्याची सखोल तपासणी करण्यात आली. त्याच्या बॅगेत विशेष कौशल्याने लपवलेले गांजाचे पॅकेट्स आढळून आले.
हायड्रोपोनिक वीड ही गांजाची प्रगत जात असून, ती नियंत्रित तापमान व आर्द्रतेच्या प्रणालीमध्ये पाण्यावर आधारित पद्धतीने पिकवली जाते. त्यामुळे तिची गुणवत्ता व किंमत इतर प्रकारांपेक्षा अधिक असते. जगभरात या प्रकाराच्या गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते. जप्त केलेल्या गांजाची पॅकेट्सही अतिशय व्यवस्थित पॅक करण्यात आलेली होती, ज्यामुळे प्रथमदर्शनी कोणालाही संशय येणार नाही.
आरोपीचे नाव अभिनय अमरनाथ यादव असून तो उत्तर भारतातील रहिवासी आहे. त्याला कस्टम्सने ताब्यात घेऊन एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपासात आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिंडिकेटचा मागोवा घेतला जात आहे. विशेषतः बँकॉक-पुणे मार्गावरून होणाऱ्या ड्रग्स वाहतुकीचा तपास विस्तारण्यात आला आहे.
ही घटना घडूनही आरोपी विमानतळाच्या सुरक्षेचे सर्व स्तर पार करत देशात पोहोचला, यामुळे विमानतळ सुरक्षेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकीकडे सुरक्षा व्यवस्था कडक असल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात इतक्या मोठ्या प्रमाणावरचा मादक पदार्थ कसा आत आला, हे प्रशासनासाठी चिंतेचे कारण बनले आहे.
कस्टम्स विभागाने नागरिकांना जागरूक राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली किंवा व्यक्तींबाबत तात्काळ अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. समाजातून अशा घटनांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हायड्रोपोनिक गांजासारख्या उच्च मूल्य असलेल्या ड्रग्सचा प्रसार रोखण्यासाठी अशा कारवायांचे महत्त्व अधिक आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter