• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली; वाहतूक ठप्प, रायगडसह राज्यात रेड अलर्ट

Jul 26, 2025
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली; वाहतूक ठप्प, रायगडसह राज्यात रेड अलर्टमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली; वाहतूक ठप्प, रायगडसह राज्यात रेड अलर्ट

बोरघाटातील दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबई लेनवरील वाहतूक ठप्प. रायगड, पालघर जिल्ह्यांसह राज्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.

सायली मेमाणे

पुणे २६ जुलै २०२५ : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही दरड गुरुवारी सकाळच्या सुमारास कोसळली असून, दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, मार्गावरील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विशेषतः रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे राज्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणांच्या पातळ्याही झपाट्याने वाढत आहेत. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह अनेक कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला होता, तर काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून अंधेरीसारख्या सखल भागांत पाणी साचले आहे. मात्र, अद्याप रेल्वे आणि वाहतुकीवर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुढील तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये अजून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सूर्या प्रकल्पातील धामणी धरण पूर्ण भरल्यामुळे त्याचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून जवळपास 9400 क्युसेक पाणी सूर्या नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असताना, नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune