पुण्यात मुळा-मुठा नद्यांना पूर; संभाजी भिडे पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुण्यात मुळा-मुठा नद्यांना पूर; संभाजी भिडे पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुण्यात मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नद्यांना पूर आला असून, संभाजी भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सायली मेमाणे
पुणे २९ जुलै २०२५ : पुण्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मुळा आणि मुठा नद्यांना पूर आला आहे. खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात मागील दोन-तीन दिवसांपासून संततधार सुरु आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला असून, प्रशासनाने धरणातून तब्बल २८ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या पाण्यामुळे मुठा नदीची पातळी प्रचंड वाढली असून, शहरातील एक महत्त्वाचा पूल म्हणून ओळखला जाणारा संभाजी भिडे पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे.
नदीपात्रालगत असणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. सिंहगड रस्त्यालगत असलेल्या काही इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. नदीलगतच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अनेक नागरिक अडकले आहेत. दैनंदिन कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत व बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तासांमध्ये पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सर्वतोपरी तयारीत असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणेकरांनी सावधगिरी बाळगावी आणि अधिकृत सूचनांचा आदर करावा, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter