जुन्नरमध्ये सीसीटीव्हीत कैद तीन बिबटे – नागरिकांत भीती, वनविभागावर दबाव

पुणे : जुन्नरमध्ये एकाच वेळी तीन बिबट्यांचा मुक्त संचार; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद,
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एकाच वेळी तीन बिबटे फिरताना सीसीटीव्हीत कैद; नागरिकांत भीती, वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी
सायली मेमाणे
पुणे २९ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका रात्रीत एकाच वेळी तीन बिबटे मोकळेपणाने वावरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहोकडी गावातील विजय जनार्दन मुरादे यांच्या घराजवळ, माळवाडी-नखलवाडी रोडवर असलेल्या बोल्हाई माता मंदिराजवळ रात्रीच्या अंधारात ही घटना घडली. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहिल्यांदा एक बिबट समोरून येताना दिसतो, त्यानंतर काही सेकंदांत आणखी दोन बिबटे त्याच मार्गावरून जाताना स्पष्टपणे दिसतात. त्यांचे डोळे अंधारात चमकत असल्यामुळे दृश्य अधिक भयावह वाटते. वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हे सर्व बिबटे भक्ष्याच्या शोधात असावेत.
जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर हा नवा प्रकार नाही. यापूर्वी देखील बिबट्यांमुळे नागरिकांना धोका निर्माण झाला होता. काही घटनांमध्ये नागरिक गंभीर जखमी झाले होते, तर काहींना जीव देखील गमवावा लागला आहे. मात्र, एका वेळेस तीन बिबटे एकत्र फिरताना पहिल्यांदाच दिसले असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः शेतकरी वर्ग आणि लहान मुलांच्या पालकांमध्ये यामुळे चिंता निर्माण झाली आहे. अनेकांनी रात्रीच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आपल्या जनावरांची सुरक्षितता लक्षात घेता, ती सुरक्षित ठिकाणी हलवली गेली आहेत.
ही घटना समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने वन विभागाकडे पिंजरे लावण्याची आणि बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. लहान मुलांना एकटे बाहेर न सोडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाकडे लेखी तक्रारी केल्या असून, त्वरित उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे. वन विभागाने याची गंभीर दखल घेतली असून, लवकरच बिबट्यांच्या हालचालींवर पाळत ठेवणे, पिंजरे लावणे आणि भक्ष्याच्या उपलब्धतेचे विश्लेषण अशा उपाययोजना हाती घेण्याची शक्यता आहे. यासोबतच नागरिकांना बिबट्याच्या वावराबाबत सतर्क राहण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.
सध्या जुन्नर तालुका बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला असून, स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिबट्यांचा वावर आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter