वाघोलीमध्ये दुकान फोडणारे चोरटे अटकेत; ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त
वाघोलीमध्ये दुकान फोडणारे चोरटे अटकेत; ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त
वाघोलीतील ‘श्री कृष्णा मेटल्स’ दुकान फोडणाऱ्या आरोपींची पोलिसांनी केली अटक. रिक्षा व रोख रक्कमसह ५९,०१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. तपासात पोलिसांची जलद कारवाई.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे ४ ऑगस्ट २०२५ : वाघोलीतील भांडयाचे दुकान फोडणारे दोघे चोरटे अटकेत; रिक्षा व रोख रक्कमसह ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरातील वाघोली परिसरात भांड्यांच्या दुकानात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. दि. ३१ जुलै २०२५ रोजी पहाटे सुमारे २ वाजता प्रियंकानगरी, वाघोली येथील ‘श्री कृष्णा मेटल्स’ या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४), ३२४(४), व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासात महिला पोउपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, पोलिस अंमलदार समीर भोरडे आणि प्रवीण केदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने चोरट्यांचा शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. आरोपींची नावे अनिकेत अविनाश इंगळे (वय २१, रा. बिरादारनगर, हडपसर) आणि साहिल रोशन शेख (वय २०, रा. बिरादारनगर, हडपसर) अशी असून एक विधीसंघर्षी बालक देखील यात सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींनी हडपसर येथून रिक्षा चोरी करून ती वापरून वाघोलीतील दुकान फोडल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण ५९,०१० रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात रोख रक्कम व चोरीस गेलेली रिक्षा हस्तगत केली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ४) श्री. सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ध्रुवराज हांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपासात पोउपनिरीक्षक मनोज बागल, सुवर्णा इंगळे आणि अंमलदारांचे विशेष योगदान राहिले.
पोलिसांच्या जलद कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला असून आरोपींवर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.