हैदराबादमध्ये धक्कादायक आत्महत्या: ‘देवाला भेटण्याची इच्छा’, ४३ वर्षीय महिलेची इमारतीवरून उडी
'देवाला भेटायचं आहे' अशी चिठ्ठी लिहून ४३ वर्षीय महिलेची आत्महत्या; पाचव्या मजल्यावरून उडी मारून मृत्यू
हैदराबादच्या हिमायतनगरमध्ये ४३ वर्षीय पूजा जैन यांनी ‘देवाला भेटण्याची इच्छा’ व्यक्त करत पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये धार्मिक अंधश्रद्धेचा उल्लेख; पोलीस तपास सुरू.
सायली मेमाणे
पुणे ४ ऑगस्ट २०२५ : Hyderabad Crime: हैद्राबादच्या हिमायतनगर भागात घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे. ४३ वर्षीय पूजा जैन या महिलेने तिच्या राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी तिने सुसाईड नोट लिहून “देवाला भेटायचं आहे” आणि “मी बलिदान देत आहे” असे उल्लेख केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करताना पूजाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत ती म्हणाली होती की, तिला सांसारिक जीवनात रस राहिलेला नाही आणि ती आता पूर्णपणे भक्तीमार्गात गुंतली आहे. तिला परमेश्वराच्या सान्निध्यात जायचं असल्यानेच तिने स्वतःचे बलिदान देण्याचा निर्णय घेतल्याचं नमूद केलं आहे. तिच्या पती अरुण कुमार जैन यांच्या अनुपस्थितीतच ही घटना घडली. पती कार्यालयात असताना तिने पाचव्या मजल्यावरून उडी घेतली.
स्थानिक शेजाऱ्यांनी सांगितले की, पूजा जैन काही महिन्यांपासून अधिकच धार्मिक झाली होती. ती दिवसरात्र ध्यान, व्रत-वैकल्य, पूजापाठ आणि आध्यात्मिक ग्रंथ वाचनामध्ये व्यस्त राहायची. अनेकदा ती म्हणायची की, तिला आता सांसारिक मोहातून मुक्त होऊन प्रभूच्या चरणी जायचं आहे. तिच्या या वागणुकीमुळे तिच्या मानसिक अवस्थेबद्दल शेजाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती, पण कोणीही ही टोकाची कृती करेल याचा विचार केला नव्हता.
पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या या घटनेत कोणताही कट किंवा मानसिक विकार असल्याचे प्राथमिक पुरावे आढळून आलेले नाहीत. मात्र, पोलिस अधिक खोलात जाऊन चौकशी करत आहेत. पूजाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे प्रकरण पुन्हा एकदा अंधश्रद्धा, मानसिक आरोग्य आणि धार्मिक अतिरेक यावर चिंतन करण्याची गरज अधोरेखित करत आहे. पोलिस याबाबत अधिक माहिती गोळा करत असून पूजाच्या कुटुंबियांकडूनही चौकशी केली जात आहे.