अनिल अंबानी अडचणीत; कर्ज घोटाळ्याप्रकरणी ED कारवाई, बँक अधिकाऱ्यांची चौकशी सुरू
अनिल अंबानी अडचणीत; कर्ज घोटाळ्याप्रकरणी ED कारवाई, बँक अधिकाऱ्यांची चौकशी सुरू
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर कर्ज घोटाळ्याच्या आरोपांनंतर ED ने खाजगी आणि सरकारी बँक अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. रिलायन्स पॉवर आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
सायली मेमाणे
पुणे ४ ऑगस्ट २०२५ : मुंबई – उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपवरील अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) यंत्रणेकडून आता या प्रकरणाशी संबंधित खाजगी आणि सरकारी बँकांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घोटाळ्यामुळे शेअर बाजारातही मोठी उलथापालथ झाली असून रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स सोमवारी ५ टक्क्यांनी कोसळले.
सोमवारी रिलायन्स पॉवरचे शेअर्स ५.०१ टक्क्यांनी घसरून ४७.७० रुपयांवर स्थिरावले, तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्सही ५.०० टक्क्यांनी घसरून २९६.०५ रुपयांवर आले. गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून कंपन्यांवरील विश्वास डळमळीत झाल्याचे चित्र आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जामध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कर्जांचे गैरवापर, चुकीच्या हिशेबवजावणीच्या पद्धती आणि अनियमित कर्ज परतफेडीच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. याच अनुषंगाने ED ने संबंधित बँक अधिकाऱ्यांना समन्स पाठवले असून, त्यांच्याकडून व्यवहारांच्या सविस्तर माहितीची चौकशी केली जात आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने या घोटाळ्याची प्राथमिक चौकशी करत असताना काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांची नोंद झाली. यामुळे ED ने आता रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या आर्थिक कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. बँक अधिकाऱ्यांकडे कंपन्यांना दिलेले कर्ज, त्यावरील कागदपत्रे आणि मंजुरी प्रक्रियेची संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही बँक अधिकाऱ्यांनी अटींमध्ये सवलती देत कर्ज मंजूर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळेच ED ने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या अधिकाऱ्यांनी नियम मोडून आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न केला का? याचा तपास सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणावर अनिल अंबानी किंवा रिलायन्स ग्रुपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, कंपनीचे आर्थिक व्यवहार पारदर्शक असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा दावा कंपनीच्या पूर्वीच्या निवेदनांतून करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे रिलायन्स ग्रुपमधील गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शेअर्सच्या सततच्या घसरणीमुळे लहान गुंतवणूकदार मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जात आहेत. अनेक बाजार विश्लेषकांनी आगामी काळात रिलायन्स ग्रुपच्या शेअर्समध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
सध्या तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर ED आहे. पुढील काही दिवसांत अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून, संबंधित कागदपत्रांची तपासणी करून गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. जर ED ला आर्थिक फसवणुकीचे ठोस पुरावे मिळाले, तर हे प्रकरण गंभीर वळण घेऊ शकते.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर आर्थिक गैरव्यवहाराचे ढग गडद होत आहेत. कर्ज प्रकरणाची ED चौकशी ही केवळ सुरुवात मानली जात असून येत्या काळात आणखी गंभीर खुलासे होण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रावरही या चौकशीचा मोठा परिणाम होऊ शकतो.