नांदेड सिटी पोलिसांची मोठी कामगिरी: पिस्तूलसह गुन्हेगार अटकेत
नांदेड सिटी पोलीसांची कारवाई: सराईत गुन्हेगार सार्थक भगतला गावठी पिस्तूलसह अटक
नांदेड सिटी पोलीसांनी पुण्यातील सराईत गुन्हेगार सार्थक भगतला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूससह अटक केली. गुन्हेगारावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल होते.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे 5 ऑगस्ट २०२५ : पुणे – नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक महत्त्वाची कारवाई करत, पोलिसांनी सराईत गुन्हेगार सार्थक बाळासाहेब भगत (वय २२) याला गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूससह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अंमलदार बंटी मोरे आणि स्वप्नील मगर यांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केली.
सदर माहितीवरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव व त्यांच्या पथकाने कोल्हेवाडी बस स्टॉप परिसरात सापळा रचला. यावेळी रेकॉर्ड वरील आरोपी सार्थक भगत याला पकडण्यात आले. त्याच्या अंगझडतीतून ३५,५०० रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १५५/२०२५ अंतर्गत आर्म्स अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) सह कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही सार्थक भगत याच्यावर हवेली पोलीस स्टेशनमध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे नोंदवलेले असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ३) श्री. संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव आणि पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, राजू वेगरे, प्रतिक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भिमराज गागुर्डे, उत्तम शिंदे, निलेख कुलथे, अक्षय जाधव, सतिश खोत यांच्या पथकाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
या कारवाईमुळे पुणे शहरात वाढणाऱ्या बेकायदा शस्त्रधारक गुन्हेगारांविरोधातील पोलिसांची कडक भूमिका अधोरेखित झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.