नवी मुंबई : डॉक्टरांच्या निष्काळजी शस्त्रक्रियेमुळे 5 रुग्ण दृष्टीहीन – वाशी पोलिसांत गुन्हा दाखल
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर 5 रुग्णांची दृष्टी गेली; डॉक्टरांवर गुन्हा दाखल
नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर 5 रुग्णांची दृष्टी गेली. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बाप-लेक डॉक्टरांवर वाशी पोलिसांत गुन्हा दाखल. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : नवी मुंबई: शहरातील एका खाजगी रुग्णालयात केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर तब्बल पाच रुग्णांनी आपली दृष्टी गमावल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी संबंधित बाप-लेक डॉक्टरांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची सुरुवात 67 वर्षीय एका व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीने झाली. त्यांनी ठाणे जिल्हा सिव्हिल सर्जन यांच्याकडून मिळवलेला अहवाल पोलिसांकडे दिला. या अहवालात संबंधित डॉक्टरांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट नमूद होते.
त्यानंतर वाशी पोलिसांनी डॉ. चंदन पंडित आणि डॉ. डी. व्ही. पंडित यांच्याविरुद्ध IPC 336, 337 आणि 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारीनुसार, डिसेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान, या खासगी रुग्णालयात पाच रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर Pseudomonas नावाच्या जीवघेण्या बॅक्टेरियामुळे डोळ्यांना संसर्ग झाला आणि त्यामुळे पाचही रुग्णांची दृष्टी कायमची गेली.
वाशी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरांकडे त्या काळात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा परवाना नव्हता. तसेच, शस्त्रक्रिया अत्यंत घाईगडबडीत आणि निष्काळजीपणाने करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. रुग्णालयांतील शस्त्रक्रियेच्या स्वच्छता व संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपी डॉक्टरांवर कारवाई करण्याची शक्यता आहे.