रत्नागिरीतील चिपळुणात आढळला आफ्रिकन ‘ब्लॅक हेरॉन’; भारतातील पहिलीच अधिकृत नोंद

रत्नागिरीतील चिपळुणात आढळला आफ्रिकन ‘ब्लॅक हेरॉन’; भारतातील पहिलीच अधिकृत नोंदरत्नागिरीतील चिपळुणात आढळला आफ्रिकन ‘ब्लॅक हेरॉन’; भारतातील पहिलीच अधिकृत नोंद
चिपळूणमध्ये पहिल्यांदाच दिसला आफ्रिकन ब्लॅक हेरॉन (Black Heron) हा दुर्मिळ पक्षी. भारतात याआधी कधीही न आढळलेल्या या पक्ष्याची अधिकृत नोंद झाली आहे.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य चिपळूण येथे भारताच्या पक्षी निरीक्षण इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण नोंदवला गेला आहे. डॉ. श्रीधर जोशी यांच्या कॅमेऱ्यात पहिल्यांदाच आफ्रिकन ‘ब्लॅक हेरॉन’ (Black Heron – Egretta ardesiaca) हे दुर्मिळ पक्षी टिपले गेले असून, ही भारतातील या पक्ष्याची पहिली अधिकृत नोंद मानली जात आहे. पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल, सुडान, केनिया, तंजानिया, मोजांबिक आणि मॅडगास्कर या देशांमध्ये आढळणारा ब्लॅक हेरॉन आफ्रिकेचा निवासी पक्षी आहे आणि त्याचे स्थलांतर फारसे आढळून येत नाही. त्यामुळे भारतात त्याचे आगमन अत्यंत दुर्मिळ मानले जाते.
डॉ. जोशी यांनी चिपळूणच्या पाणथळ भागात हे दोन पक्षी पाहिले आणि त्यांचे स्पष्ट फोटो घेतले. सुरुवातीला काही पक्षी अभ्यासकांनी त्याला ‘ब्लॅक क्राऊन्ड नाईट हेरॉन’ समजले, मात्र पक्ष्याची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये – जसे की त्याचे लांबट पाय, पूर्ण काळे शरीर आणि विशिष्ट मासेमारी पद्धत पाहून तज्ज्ञांनी एकमताने याला ब्लॅक हेरॉन म्हणून ओळखले. हा पक्षी मासे पकडताना आपली पिसं पसरवून सावली तयार करतो, ज्यामुळे मासे सहज दिसतात आणि पकडले जातात — ही खास शिकार शैली या पक्ष्याची ओळख आहे.
भारतामध्ये याआधी ब्लॅक हेरॉनचा ठोस पुरावा कधीच मिळालेला नव्हता. त्याच्या चिपळूणमधील अचानक आगमनाने पक्षी निरीक्षकांमध्ये एक वेगळीच खळबळ निर्माण केली आहे. डॉ. जोशी यांनी या पक्ष्याच्या छायाचित्रांसह संपूर्ण माहिती इंडियन बर्ड जर्नलकडे पाठवली असून, भारतातील पहिल्या अधिकृत नोंदीसाठी प्रक्रिया सुरू आहे.
ही घटना फक्त चिपळूणसाठी नव्हे, तर संपूर्ण भारतातील निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरतो. ब्लॅक हेरॉनचा भारतात प्रथमच आढळ झाल्याने, महाराष्ट्रातील जैवविविधतेच्या नोंदीत एक नविन पान भरले गेले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter