पुणे मेट्रोत तोबा गर्दी – सुट्टी संपताच चाकरमान्यांचा लोंढा, मुंबई लोकलसारखी धक्काबुक्की

पुणे मेट्रोत तोबा गर्दी – सुट्टी संपताच चाकरमान्यांचा लोंढा, मुंबई लोकलसारखी धक्काबुक्की
रक्षाबंधन आणि रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी पुणे मेट्रो स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली. तिकीटासाठी लांब रांगा, डब्यांमध्ये उभे राहून प्रवास, आणि मुंबई लोकलसारखी परिस्थिती पाहायला मिळाली.
सायली मेमाणे
पुणे ११ ऑगस्ट २०२५ : पुणे मेट्रोमध्ये सोमवारी सकाळी प्रचंड गर्दीचे दृश्य पाहायला मिळाले. रक्षाबंधनाची सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या रविवारी अनेक पुणेकर आपल्या गावी गेले होते. मात्र, सुट्टी संपल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच सोमवारी, कामावर परतणाऱ्या प्रवाशांचा लोंढा मेट्रो स्थानकांवर उसळला. सकाळी 9 च्या सुमारास पुणे स्टेशन मेट्रो स्थानकावर तिकीट खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या. काही प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी 15 ते 20 मिनिटे थांबावे लागले.
प्लॅटफॉर्मवरही प्रचंड गर्दी असल्याने चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. व्हॉटसअपद्वारे तिकीट खरेदी प्रक्रियेची माहिती नसलेल्या प्रवाशांमुळे गोंधळ अधिक वाढला.
डब्यांमधील परिस्थितीही मुंबई लोकलची आठवण करून देणारी होती. ऐरवी मेट्रोत सहज बसायला जागा मिळत असली तरी सोमवारी अनेकांना उभे राहूनच प्रवास करावा लागला. गर्दीमुळे चढणे-उतरणे ही एक मोठी कसरत ठरली.
शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी गेलेले अनेक पुणेकर एकाच दिवशी परतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. यामुळे नियमित प्रवाशांच्या प्रवासात गैरसोय झाली आणि मेट्रो प्रशासनावर अचानक आलेल्या प्रवासी ताणाचा सामना करण्याची वेळ आली.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter