शरद पवार आज पुण्यात: विविध कार्यक्रमांना उपस्थिती, साखर संकुल, एस एम जोशी सभागृह आणि बालगंधर्व रंगमंदिरात होणार हजेरी
शरद पवार आज पुण्यात: विविध कार्यक्रमांना उपस्थिती, साखर संकुल, एस एम जोशी सभागृह आणि बालगंधर्व रंगमंदिरात होणार हजेरी
जेष्ठ नेते शरद पवार आज पुण्यात असून सकाळपासून भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दुपारी किशोर पवार स्मृतीदिनासाठी एस एम जोशी सभागृहात, तर संध्याकाळी उल्हासदादा पवार यांच्या 75व्या वाढदिवसासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे उपस्थित राहणार.
सायली मेमाणे
पुणे १६ ऑगस्ट २०२५ : महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आज पुण्यात असून त्यांच्या भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगवली आहे. सकाळपासून त्यांनी साखर संकुल येथे विविध व्यक्तींशी संवाद साधत भेटीगाठी सुरू केल्या. शरद पवार हे सातत्याने महाराष्ट्रभर दौरे करत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर देत आहेत.
आज दुपारी तीन वाजता शरद पवार एस एम जोशी सभागृहात किशोर पवार यांच्या स्मृतीदिना निमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विविध मान्यवर सहभागी होणार असून, पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. शरद पवार हे आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांना संदेश देणार असल्याचे अपेक्षित आहे.
याशिवाय सायंकाळी पाच वाजता ते काँग्रेस नेते उल्हासदादा पवार यांच्या पंचाहत्तरी (75व्या वाढदिवसाच्या) सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पुण्यातील प्रतिष्ठित बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून, अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील संवाद आणि ऐक्याला नवी दिशा मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शरद पवार यांच्या पुणे भेटीमुळे स्थानिक राजकीय समीकरणांवर आणि आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडेच महाराष्ट्रातील राजकारणात बदलते समीकरण पाहता शरद पवार यांच्या हालचालींना विशेष महत्त्व आहे. त्यांचे दौरे हे केवळ सामाजिक कार्यक्रमापुरते मर्यादित नसून राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे निरीक्षक मानतात.
आजच्या भेटीगाठींमधून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना चालना देणे, पक्ष संघटन मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांसाठी तयारी यावर त्यांचा भर असेल. त्यामुळे शरद पवार यांच्या आजच्या पुणे दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.