उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज्य आपत्कालीन कंट्रोल रुममधून पावसाचा आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज्य आपत्कालीन कंट्रोल रुममधून पावसाचा आढावा
मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्कालीन कंट्रोल रुममधून परिस्थितीचा आढावा घेतला. आवश्यक सूचना देत मदतकार्याला गती.
सायली मेमाणे
पुणे २० ऑगस्ट २०२५ : मुंबई | राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई शहरासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली.
या वेळी त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचे थेट आढावे घेतले. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, अडकलेल्या लोकांना वाचवणे, वाहतुकीवरील परिणाम, तसेच पूरग्रस्त भागांमध्ये सुरू असलेल्या मदतकार्याबाबत त्यांनी सविस्तर चौकशी केली.
उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. बचाव पथकांची संख्या वाढवावी, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सुरक्षित ठिकाणीच थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूराचा धोका वाढला आहे. या संदर्भात नियंत्रण कक्षाकडून सतत माहिती गोळा करून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.
सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासन आणि बचाव पथके सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.