डेक्कन पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी! हरवलेले ४.५ लाखांचे २६ मोबाईल हस्तगत
डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे – ४.५ लाखांचे हरवलेले मोबाईल परत
पुण्यात डेक्कन पोलीस स्टेशन सायबर पथकाने CEIR प्रणालीचा वापर करून तब्बल ४.५ लाख रुपये किमतीचे हरवलेले २६ मोबाईल शोधून काढले. मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे २० ऑगस्ट २०२५ : पुणे शहरातील डेक्कन पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने मोठी कामगिरी करत तब्बल ४,५०,०००/- रुपये किमतीचे हरवलेले २६ मोबाईल हस्तगत करून तक्रारदारांना परत केले आहेत. केंद्र शासनाने सुरू केलेल्या Central Equipment Identity Register (CEIR) प्रणालीचा वापर करून ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
मोबाईल हरवणे किंवा चोरी होणे ही सामान्य बाब आहे. अशा वेळी CEIR प्रणाली उपयुक्त ठरते. हरवलेला मोबाईल कोणत्या नेटवर्कवर वापरला जात आहे याची माहिती या प्रणालीच्या मदतीने मिळवता येते. त्याचाच वापर डेक्कन पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने केला.
सायबर विभाग प्रमुख वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार उमा पालवे यांनी हरविलेल्या मोबाईलची माहिती CEIR प्रणालीतून गोळा केली. त्यावर तांत्रिक तपास करून महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच इतर राज्यांत वापरले जात असलेले मोबाईल शोधून काढले गेले.
या प्रक्रियेत मोबाईल वापरणाऱ्यांशी आणि संबंधित पोलीस ठाण्यांशी संवाद साधून एकूण २६ मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यांची किंमत सुमारे ४.५ लाख रुपये इतकी आहे.
हस्तगत मोबाईल फोन तक्रारदारांना डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या हस्ते परत करण्यात आले. त्यामुळे तक्रारदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
जर मोबाईल हरवला तर नागरिकांनी खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी:
- सर्वप्रथम punepolice.gov.in/lostfoundreg या वेबसाईटवर तक्रार नोंद करावी.
- तक्रारीत जवळचे पोलीस स्टेशन निवडून त्यांना एक कॉपी द्यावी.
- त्यानंतर हरवलेल्या मोबाईलचा नंबर असलेले नवीन सिमकार्ड वापरात आणावे.
- शासनाच्या https://www.ceir.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून रिक्वेस्ट आयडी घ्यावा.
- तो आयडी संबंधित पोलीस स्टेशनला द्यावा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांना मोबाईल शोधण्यात अधिक सोय होते.
या कामगिरीसाठी अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, उप-आयुक्त परि-१ श्री. कृषिकेष रावले, तसेच सहा. पोलीस आयुक्त (विश्रामबाग विभाग) श्री. साईनाथ ठोंबरे यांनी आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या सूचनेनुसार सायबर पथकाने ही कारवाई पार पाडली.
डेक्कन पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने केलेली ही कामगिरी प्रशंसनीय असून, नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या मोबाईलचा शोध लावण्यात CEIR प्रणाली किती उपयुक्त आहे हे स्पष्ट झाले आहे.