अटल सेतूपेक्षा महाग टोल, ठाणेकरांना मोठा धक्का

अटल सेतूपेक्षा महाग टोल, ठाणेकरांना मोठा धक्का
ठाणे ते नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या उन्नत मार्गासाठी 365 रुपये टोल आकारला जाणार आहे. अटल सेतूपेक्षा जास्त असलेला हा टोल ठाणेकरांसाठी धक्कादायक ठरणार असून प्रकल्प 2031 पर्यंत पूर्ण होणार आहे.
सायली मेमाणे
पुणे ४ सप्टेंबर २०२५ : ठाणेकरांसाठी नवी मुंबई विमानतळ गाठणे आता सोयीचं होणार असलं तरी त्याची किंमत मात्र जास्त मोजावी लागणार आहे. ठाणे ते नवी मुंबई विमानतळाला जोडणारा सहापदरी उन्नत मार्ग बांधण्यात येत आहे. तब्बल 25 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून 2031 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वाला जाणार आहे. या उन्नत मार्गामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि भाईंदर परिसरातील नागरिकांना थेट नवी मुंबई विमानतळाशी जोडणारा पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या या भागातील नागरिकांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठण्यासाठी मोठा प्रवास करावा लागतो. रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय या सगळ्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. नवी मुंबई विमानतळाच्या निर्मितीनंतर आणि या उन्नत मार्गामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि प्रवास सोपा होईल.
मात्र, या सोयीसाठी प्रवाशांना मोठा टोल मोजावा लागणार आहे. ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्गाच्या एकेरी प्रवासासाठी तब्बल 365 रुपये टोल आकारला जाणार आहे. तुलना केली तर मुंबईतील समुद्री पूल अटल सेतूवर 250 रुपये टोल आकारला जातो, परंतु ठाणे ते नवी मुंबई मार्गावरील टोल त्यापेक्षा जास्त आहे. हलक्या चारचाकी वाहनांसाठी 365 रुपये, इतर हलक्या वाहनांसाठी 590 रुपये, तर ट्रक आणि बससाठी तब्बल 1235 रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा टोल दरवर्षी वाढणार असून 2031 मध्ये प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच लागू होणार आहे.
हा आकडा समोर आल्यानंतर प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक प्रवासी असा प्रश्न उपस्थित करत आहेत की विमानतळ गाठण्यासाठी सोयीस्कर मार्ग मिळत असला तरी टोल इतका जास्त असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांवर अतिरिक्त भार पडणार आहे. मात्र प्रकल्प राबवणाऱ्या यंत्रणेकडून असा दावा केला जात आहे की उन्नत मार्गामुळे वाहतूक कोंडी टळेल आणि प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होईल. यामुळे इंधनाची बचत, तणावमुक्त प्रवास आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होईल.
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अवघ्या काही दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रारंभी दरवर्षी सुमारे 20 लाख प्रवासी या विमानतळाचा वापर करतील असा अंदाज आहे. पुढे 2038 पर्यंत विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर तब्बल 90 लाख प्रवासी इथून प्रवास करतील. यामुळे केवळ ठाणेकरांचाच नाही तर संपूर्ण उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग या विमानतळाच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाचा दुवा ठरणार आहे, पण त्याचबरोबर टोलचे ओझे प्रवाशांसाठी वादग्रस्त ठरू शकते.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter