पंजाब पूर 2025: राघव चड्ढा यांनी पूरग्रस्त पंजाबसाठी 3.25 कोटींच्या मदतीची घोषणा केली
पंजाब पूर 2025: राघव चड्ढा यांनी पूरग्रस्त पंजाबसाठी 3.25 कोटींच्या मदतीची घोषणा केली
आप पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी पंजाब पूर मदतीसाठी आपल्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतून 3.25 कोटी रुपये जाहीर केले. ही मदत गुरदासपूर धरण दुरुस्ती आणि अमृतसर पुनर्वसनासाठी वापरली जाणार आहे.
सायली मेमाणे
पुणे ४ सप्टेंबर २०२५ : Punjab Flood: पंजाबमधील पुरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. 23 जिल्ह्यांमध्ये पूराचे मोठे संकट निर्माण झाले असून आतापर्यंत 30 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदत कार्य सुरू असले तरी सततच्या पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. या गंभीर परिस्थितीत आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पंजाबकरांच्या मदतीसाठी पुढाकार घेत 3.25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. हा निधी त्यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून देण्यात येणार आहे.
खासदारांच्या कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, या निधीतून गुरदासपूर जिल्ह्यातील रावी नदीच्या बांधांच्या दुरुस्तीसाठी 2.75 कोटी रुपये तर अमृतसर जिल्ह्यातील मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी 50 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पूरामुळे जी प्रचंड हानी झाली आहे, त्यातून जनतेला दिलासा देण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.
पूरामुळे मृत्युमुखी पडलेल्या 30 जणांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करताना राघव चड्ढा यांनी सांगितले की, हा निधी माझा नसून पंजाबच्या जनतेचा आहे. पंजाबकरांची सेवा आणि राज्याची पुनर्बांधणी यासाठी प्रत्येक रुपया खर्च केला जाईल. त्यांनी भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल, पंजाब पोलीस, डॉक्टर आणि इतर अधिकारी ज्यांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्यात योगदान दिले, त्यांचे मनापासून कौतुक केले.
यासोबतच राघव चड्ढा यांनी केंद्र सरकारला आवाहन केले की, पंजाबच्या पुरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि बाधित जनतेच्या पुनर्वसनासाठी शक्य ती सर्व मदत द्यावी. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ संदेश पोस्ट करत पंजाबमधील गंभीर परिस्थितीची माहिती दिली आणि नागरी समाज, स्वयंसेवी संस्था तसेच तरुण स्वयंसेवक यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, पंजाबची ही पवित्र भूमी आहे जिथे गुरु नानकांनी लंगर परंपरेची सुरुवात केली आणि आजही प्रत्येक गावात आणि गुरुद्वारात लंगर सुरू आहे.
दरम्यान, या संकटाच्या काळात पंजाबमधील कलाकारही मदतीला पुढे आले आहेत. लोकप्रिय गायक आणि अभिनेता एमी विर्क यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जाऊन लोकांना मदत केली. दुसरीकडे दिलजीत दोसांझ यांनी 10 गावे दत्तक घेतली असून तेथे मदतकार्य सुरू केले आहे. मिका सिंगची टीमही सक्रिय आहे आणि ती बचावकार्यात सहभागी होत लोकांना मदत पोहोचवत आहे.
1998 नंतरचा हा सर्वात मोठा पूर मानला जात आहे. पंजाबमधील शेतजमीन आणि अनेक गावे जलमय झाली असून लाखो लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. राज्य प्रशासनाने 7 सप्टेंबरपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात असून बचाव पथकांकडून दिवस-रात्र काम सुरू आहे.
या परिस्थितीत विविध पातळ्यांवरून मदतकार्य सुरू असून राजकीय नेते, कलाकार, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक मिळून पंजाबकरांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. राघव चड्ढा यांची 3.25 कोटी रुपयांची मदत ही राज्याच्या पुनर्बांधणीसाठी मोठा हातभार ठरणार आहे.