महाराष्ट्र पावसाचा इशारा: पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा अलर्ट

0
महाराष्ट्र पावसाचा इशारा: पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा अलर्ट

महाराष्ट्र पावसाचा इशारा: पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा अलर्ट

भारतीय हवामान विभागाचा मोठा अंदाज! महाराष्ट्रात पुढील 24 तास मुसळधार पाऊस, कोकण व घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात येलो अलर्ट. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

सायली मेमाणे

पुणे ५ सप्टेंबर २०२५ : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून सतत पावसाची रिपरिप सुरू असून आता पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच मराठवाड्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नंदुरबार, नाशिक आणि पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या रात्री मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसून आला होता. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील भागात पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

देशाच्या इतर भागांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात मात्र पावसामुळे काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून त्याचा सकारात्मक परिणामही होत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यामुळे नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील आठ तालुक्यांना पाण्याचा पुरवठा होणार आहे. एकूण 175 गावांना सिंचन आणि पिण्याचे पाणी या धरणातून पुरवले जाते. गिरणा धरणातील जलसाठा 96% पेक्षा जास्त झाल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच औद्योगिक वसाहतींचाही वर्षभराचा प्रश्न सुटणार आहे.

धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने गिरणा धरणाचा एक दरवाजा 20 सेंटीमीटरने उघडला आहे. धरणातून 814 क्यूसेक्स पाणी तर मन्याड धरणातून 417 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात होत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाण्याचा विसर्ग परिस्थितीनुसार वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतोय. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सततच्या पावसामुळे काही भागांत शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे, मात्र धरणातील भरपूर जलसाठा हा आगामी हंगामासाठी फायदेशीर ठरणार आहे. गिरणा धरणातील पाण्यामुळे नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून खरीप आणि रब्बी हंगामाचीही चिंता कमी झाली आहे.

पावसाचा जोर लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहणे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि नदीकाठच्या गावांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तास महाराष्ट्रातील पावसासाठी निर्णायक ठरणार आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *