Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांकडून 94% संमती; मोजणी सुरू
पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांकडून 94% संमती; मोजणी सुरू
सासवड येथील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सात गावांतील 1285 हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी मोजणी सुरू. शेतकऱ्यांनी 94% संमती दिल्याने प्रक्रिया शांततेत पार पडली.
सायली मेमाणे
पुणे २७ सप्टेंबर २०२५ : सासवड तालुक्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत आज एक महत्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. शुक्रवारपासून प्रत्यक्ष जमिनीच्या मोजणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ९४ टक्के शेतकऱ्यांनी प्रकल्पास संमती दिल्यामुळे मोजणी शांततेत पार पडत आहे. या प्रक्रियेमुळे विमानतळ प्रकल्प लवकरच पुढील टप्प्यात जाऊ शकणार आहे.
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांतील १२८५ हेक्टर (सुमारे ३ हजार एकर) क्षेत्र संपादित होणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र निश्चित होते, मात्र विरोध लक्षात घेऊन शासनाने जमीन क्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतला. २५ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरच्या दरम्यान संमतीपत्र स्वीकारण्यात आले, त्यानंतर मुदतवाढ देण्यात आली. अखेर २५ सप्टेंबरपर्यंत ९४ टक्के शेतकऱ्यांची संमती मिळाल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी स्पष्ट केले.
२५ सप्टेंबरनंतर लगेचच २६ सप्टेंबरपासून मोजणी प्रक्रिया सुरु झाली. एखतपूर, मुंजवडी आणि उदाचीवाडी या गावांमध्ये पाच टीमद्वारे दररोज प्रत्येकी २५ एकर मोजणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोजणीमध्ये भूमी अभिलेख, कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण विभागांसह विविध विभाग सहभागी आहेत. घरं, जनावरे, झाडे, पाईपलाईन, विहिरी, तळी आदींचा सर्व्हेही करण्यात येत आहे.
पूर्वी शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे भूसंपादन प्रक्रिया अडखळली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची संमती मिळाल्यामुळे मोजणीला कोणताही विरोध झाला नाही. नवरात्र उत्सवाच्या काळात नारळ फोडून मोजणी सुरू करताना अधिकारी आनंदित दिसले, परंतु शेतकऱ्यांचे अश्रू आणि भावना स्पष्ट दिसून आले.
गावनिहाय मोजणी होणारे क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे: एखतपूर २०१ हेक्टर, खानवडी २६६, कुंभारवळण २५५, मुंजवडी ७७, पारगाव १८८, उदाचीवाडी ४५ आणि वनपुरी १७५ हेक्टर. विमानतळ प्रकल्पासाठी एकूण सुमारे ३ हजार एकर जमीन घेण्याचे नियोजन असून, आतापर्यंत २,७०० एकरपेक्षा अधिक जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे.
तालुक्यातील सात गावांमध्ये सरकारच्या मालकीची सुमारे २०० एकर जमीन देखील आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी एकूण २,९०० एकरपेक्षा अधिक जमीन उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांकडून संमती मिळाल्यामुळे पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आता नव्या टप्प्यात पुढे जाण्याची संधी मिळाली आहे.
पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे सासवड आणि आसपासच्या भागात नागरी सुविधा, आर्थिक प्रगती आणि रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे. मोजणीची ही प्रक्रिया शांततेत पार पडल्याने भविष्यातील भूमी संपादनासाठी प्रशासनाच्या तयारीला मोठा आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या संमतीने हा प्रकल्प आता अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.