Ajit Pawar Death: रोहित पवारांचा ‘घातपात’ संशय; पटेल, तटकरे, अरोरा कनेक्शनवर नवे प्रश्न
Ajit Pawar Death: रोहित पवारांचा ‘घातपात’ संशय; पटेल, तटकरे, अरोरा कनेक्शनवर नवे प्रश्न
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी घातपाताचा संशय व्यक्त करत फाईलवरील सही, लास्ट मिनिट बुकिंग, राजकीय कन्सल्टंट आणि ब्लॅक बॉक्स तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
पुणे 12 फेब्रुवारी २०२६ : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या घटनेबाबत गंभीर आणि खळबळजनक दावे करत हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केला आहे. कुणाच्याही नावाचा थेट उल्लेख टाळत त्यांनी अनेक मुद्दे मांडले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
रोहित पवार यांनी अपघाताच्या दिवशी घडलेल्या घटनांचा क्रम लावत काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, एका वरिष्ठ व्यक्तीच्या सांगण्यावरून अजित पवार यांनी एका महत्त्वाच्या फाईलवर तातडीने स्वाक्षरी केली होती. जर प्रवास आधीच ठरलेला असता, तर विमानाचे बुकिंग आधी झाले असते. मात्र, विमानाचे बुकिंग आदल्या दिवशी सायंकाळी 7.13 वाजता करण्यात आले, ही बाब संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फाईलवर सही करण्यासाठी कोणाकडून फोन आले होते, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी काही नावे सूचित केल्याचेही सांगण्यात आले.
यासोबतच रोहित पवार यांनी एका राजकीय कन्सल्टंटच्या भूमिकेवर बोट ठेवले. अजित पवार शेकडो कोटी रुपयांच्या कंत्राटाबाबत कठोर भूमिका घेत होते आणि ते कंत्राट रद्द करण्याच्या तयारीत होते, असा दावा त्यांनी केला. या मुद्द्यावरून पक्षात अंतर्गत मतभेद निर्माण झाले असावेत, असे संकेतही त्यांनी दिले. योगायोगाने संबंधित कन्सल्टंटने अलीकडेच एक विमान खरेदी केल्याची माहितीही त्यांनी समोर आणली, ज्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गंभीरतेने पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
बारामती येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी डिझाईन बॉक्सशी संबंधित व्यक्तींना फटकारल्याचा उल्लेखही रोहित पवार यांनी केला. त्यानंतरही काही नेत्यांकडून कंत्राट कायम ठेवण्याचा दबाव होता, असा दावा त्यांनी केला. या सर्व घटनाक्रमामुळे अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून इतर कारणांचीही चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
ब्लॅक बॉक्स संदर्भातही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. ब्लॅक बॉक्स स्वतःहून बंद होऊ शकत नाही. जर तो बंद अवस्थेत आढळला असेल, तर त्यामागे तांत्रिक कारण नसून हेतुपुरस्सर छेडछाड असू शकते, असा संशय त्यांनी व्यक्त केला. डीजीसीएकडून तपास सुरू असला तरी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत एका महिन्याच्या आत तपास पूर्ण व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“हा अपघात आहे की घातपात, हे स्पष्ट व्हायला हवे. आम्ही सत्याचा पाठपुरावा करणार आहोत,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आता तपास यंत्रणा काय निष्कर्ष काढते आणि या प्रकरणाचा पुढील राजकीय परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information