अजित पवार गटाचे वर्चस्व! महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीसाठी ऑलिम्पिक पॅनेल जाहीर
अजित पवार गटाचे वर्चस्व! महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीसाठी ऑलिम्पिक पॅनेल जाहीर
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (MOA) निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनेलचे पारडे जड. २१ उमेदवारांपैकी ३ बिनविरोध निवडून; क्रीडा विकासात अजित पवार यांच्या नेतृत्वाचा प्रभाव.
सायली मेमाणे
पुणे ३१ ऑक्टोबर २०२५ : पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (MOA) निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ऑलिम्पिक पॅनेलचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या क्रीडा क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या पवार यांच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांचा गट प्रभावी ठरणार आहे.
मुंबईत येत्या २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनेलचे २१ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारीवाला यांनी या पॅनेलची घोषणा करताना सांगितले की, ३१ पैकी २५ पेक्षा जास्त क्रीडा संघटनांनी अजित पवार यांना समर्थन जाहीर केले आहे. या पाठिंब्यामुळे निवडणुकीत पवार गटाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनेलमध्ये अध्यक्ष म्हणून स्वतः अजित पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अशोक पंडित, तर उपाध्यक्ष म्हणून आदिल सुमारीवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे हे तिघेही बिनविरोध निवडले गेले आहेत. सचिव म्हणून नामदेव शिरगांवकर, सहसचिव म्हणून चंद्रजीत जाधव, उदय डोंगरे, मनोज भोरे, निलेश जगताप, तर खजिनदार म्हणून स्मिता शिरोळे यांची नावे जाहीर झाली आहेत.
कार्यकारिणी सदस्य म्हणून संदिप चौधरी, संदिप ओंबासे, राजेंद्र निम्बाते, गिरीश फडणीस, रणधीरसिंग, किरण चौगुले, समीर मुणगेकर, संजय वळवी आणि सोपान कटके या उमेदवारांचा समावेश आहे. एकूण १७ पेक्षा जास्त उमेदवार संघटनेशी संबंधित असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा विजय जवळपास निश्चित असल्याचे आदिल सुमारीवाला यांनी सांगितले.
आधीच उपाध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार – आदिल सुमारीवाला, प्रदिप गंधे आणि प्रशांत देशपांडे – बिनविरोध निवडले गेले आहेत. ही निवड पवार गटाच्या संघटनात्मक शक्तीची झलक दर्शवणारी आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदिप गंधे यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांत महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल स्थान मिळवले असून, या यशाचे श्रेय महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला आणि अजित पवार यांच्या कार्यकुशल नेतृत्वाला जाते.
त्यांनी पुढे सांगितले की, अजित पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन आणि देशातील पहिले क्रीडा संग्रहालय उभारले जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना केवळ सुविधा नाहीत तर क्रीडा संस्कृती वाढीस लागली आहे. क्रीडांगणावर महाराष्ट्राने मिळवलेले यश हे पवार यांच्या दूरदृष्टीचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनेक क्रीडा संघटनांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा त्यांच्याच गटाला संपूर्ण पाठिंबा दिल्याने या निवडणुकीत पवार गटाचा विजय निश्चित मानला जात आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीमुळे राज्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा क्रीडा वर्तुळात व्यक्त होत आहे.