Amarnath Yatra 2025 : अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू, बाबा बर्फानीचे दर्शन कसे घ्याल? संपूर्ण माहिती येथे
अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू, बाबा बर्फानीचे दर्शन कसे घ्याल?
Amarnath Yatra 2025 लवकरच सुरू होणार आहे. बाबा बर्फानीचे दर्शन, यात्रेचा मार्ग, नोंदणी प्रक्रिया, RFID कार्ड, प्रवासाची माहिती आणि राहण्याच्या सोयी यासंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्या.
सायली मेमाणे
अमरनाथ २८ जून २०२५ : अमरनाथ यात्रा ही देशातील सर्वात कठीण, पण श्रद्धा आणि भक्तीने भरलेली एक महत्त्वाची तीर्थयात्रा मानली जाते. यंदा ही यात्रा ३ जुलै २०२५ पासून सुरू होणार असून देशभरातून हजारो भाविक बाबा बर्फानीचे दर्शन घेण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या अमरनाथ गुहेकडे निघणार आहेत. ही गुहा समुद्रसपाटीपासून सुमारे ३,८८० मीटर उंचीवर असून येथे दरवर्षी बर्फातून निर्माण होणारा शिवलिंग भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असतो. अमरनाथ यात्रेसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत – पहलगाम आणि बालटाल. दोन्ही मार्ग खडतर असून त्याचा अनुभव वेगवेगळा असतो. विमानाने जायचे असल्यास श्रीनगरपर्यंत थेट विमानसेवा उपलब्ध आहे. रेल्वेने जाणाऱ्या भाविकांसाठी जम्मूपर्यंत गाड्या उपलब्ध आहेत. जम्मूपासून पहलगाम किंवा बालटालपर्यंत बस अथवा टॅक्सीने प्रवास करावा लागतो. श्रीनगर विमानतळावरून शेअरिंग टॅक्सीचे भाडे ८०० ते १००० रुपये आणि खासगी टॅक्सीचे भाडे ३००० ते ४००० रुपये आहे. यात्रेपूर्वी अनिवार्य नोंदणी करणे आवश्यक आहे. RFID कार्डशिवाय प्रवेश दिला जात नाही. या कार्डाची फी २५० रुपये असून प्रत्येक भाविकाला ते आवश्यक आहे. बालटाल ते गुहा अंतर सुमारे १४ किमी असून डोमेल गेटपासून प्रवेश दिला जातो. पहलगाम मार्ग चंदनवाडीपासून सुरू होतो आणि त्याचे अंतर सुमारे ३२ किमी असते. डोमेल गेटवरून सकाळी ४ ते १० या वेळेतच प्रवेश दिला जातो. वाटेत अनेक ठिकाणी मोफत अन्नाची व्यवस्था असते. घोडा आणि पालखीचे पर्यायही उपलब्ध असून एका बाजूसाठी घोड्याचे भाडे २००० ते २५०० रुपये आणि दोन्ही बाजूसाठी ४००० ते ५००० रुपये इतके असते. पालखीची किंमत एका बाजूस ८ हजार रुपयेपर्यंत पोहोचते. मात्र शेवटचा एक किलोमीटर सर्वांनाच पायीच जावे लागते. राहण्याची सोय बालटालमध्ये तंबूत केली जाते. एका तंबूचे दर ५०० रुपये असून काही ठिकाणी मोफत तंबूंचीही सुविधा असते. भाविकांनी लवकर पोहोचणे अधिक फायदेशीर ठरते. दर्शनासाठी गर्दी टाळायची असेल तर पहाटेच निघावे. डोमेलपासून पहिल्या २ किमीसाठी बॅटरी रिक्षा किंवा लहान बसही उपलब्ध आहेत. पहिल्यांदाच यात्रेला जात असाल तर अनुभवी व्यक्ती किंवा अधिकृत टूर ऑपरेटरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. संपूर्ण प्रवास अत्यंत भक्तिभाव, तयारी आणि शारीरिक ताकद घेऊन करावा लागतो. अमरनाथ यात्रा ही फक्त एक धार्मिक यात्रा नसून ती एक आध्यात्मिक अनुभव आहे. कठीण वाटचालीनंतर जेव्हा बाबा बर्फानीचे दर्शन होते, तेव्हा त्या एका क्षणासाठी सगळ्या थकव्याला विसरून भक्त समाधानाने भरून जातो.