Aqualine BKC Metro Station: वरळी, बीकेसी मेट्रो स्थानकात गळती थांबेना!
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एमएमआरसीवर निशाणा साधला.
मुंबईच्या मेट्रो ३ मार्गावरील बीकेसी आणि वरळी स्थानकांत पावसामुळे गळती सुरू; काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एमएमआरसीवर निशाणा साधला.
सायली मेमाणे
मुंबई १९ जून २०२५ : मुंबईतील भुयारी मेट्रो मार्गिका ३ (कफ परेड ते आरे) पुर्ण क्षमतेने सुरु होण्याआधीच बांधकामाच्या गुणवत्ता प्रश्नांकित करणाऱ्या घटना समोर येत आहेत. नुकतीच आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पावसाचे पाणी शिरल्याची घटना ताजी असतानाच, आता बीकेसी आणि वरळी येथील मेट्रो स्थानकांतही गळतीचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. काही ठिकाणी छतांमधून गळती सुरू असून भिंतींना ओलसरपणा स्पष्ट दिसत आहे.
वरळी मेट्रो स्थानकात चार प्रमुख ठिकाणी पाणी गळती होत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले. पूर्वी एमएमआरसीने अशा ठिकाणी बादल्या ठेवून गळती रोखण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे तीव्र टीका झाली होती. आता मात्र कर्मचारी थेट सतत पाणी पुसताना दिसत आहेत. बीकेसी स्थानकातही अशीच स्थिती असून मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तात्पुरत्या दोऱ्यांच्या साहाय्याने गळतीचा भाग संरक्षित केला आहे.
या संदर्भात काँग्रेसच्या मुंबई शहराध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्टपणे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर गळतीचे फोटो शेअर करत एमएमआरसीच्या बांधकामाच्या दर्जावर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली का, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी बीकेसी स्थानकाच्या गळणाऱ्या छताचा फोटोही समाजमाध्यमांवर टाकला.
या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मेट्रो स्थानकांवर पाणी गळतीचे फोटो काढण्यास कर्मचाऱ्यांकडून सक्त मनाई केली जात आहे. काही जणांना फोटो डिलीट करण्यासही सांगितले गेले असून, चित्रीकरणास बंदी असलेले फलकही स्थानकांवर लावण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
एमएमआरसीच्या म्हणण्यानुसार, हा पावसाळा म्हणजे नव्याने कार्यान्वित झालेल्या मेट्रोचा “असेसमेंट फेज” आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी किरकोळ समस्या आढळत असून त्यावर तातडीने कंत्राटदारांमार्फत दुरुस्ती केली जात आहे. पावसाळ्याच्या काळात काही ठिकाणी एअर वेंट्स, वातानुकूलनासाठी डक्ट्स आणि मोठ्या खुल्या जागांमधून पावसाचे पाणी आत येऊ शकते. यामुळे निर्माण होणाऱ्या थेंबांना त्रुटी म्हणणे चुकीचे ठरेल, असा एमएमआरसीचा दावा आहे. तसेच, ही परिस्थिती पूरसदृश नसून सामान्य स्थिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न, प्रत्यक्ष पाहणीतील गळतीचे चित्र, आणि माध्यमांवर बंदी घालण्याचे प्रकार या सर्व गोष्टी या प्रकल्पाच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त करतात. अवघ्या काही आठवड्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या या बहुप्रतिक्षित भुयारी मेट्रो प्रकल्पात इतक्या लवकर गळतीच्या घटना घडणे हे निश्चितच गंभीर बाब ठरत आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz