Asha Bhosle : “राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहिती” – ठाकरे बंधूंवरील प्रश्नावर आशा भोसलेंचं स्पष्ट उत्तर
आशा भोसलेंनी “मला फक्त आशिष शेलार माहित आहेत” असं विधान करत राजकीय चर्चांपासून स्वत:ला दूर ठेवलं.
मनसे आणि शिवसेना (उद्धव गट) यांच्या एकत्रित मोर्च्यावर विचारल्यावर ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी “मला फक्त आशिष शेलार माहित आहेत” असं विधान करत राजकीय चर्चांपासून स्वत:ला दूर ठेवलं. ५ जुलैच्या मोर्चाकडे महाराष्ट्राचं लक्ष!
सायली मेमाणे
पुणे २८ जून २०२५ : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाषेचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याने सगळ्या राज्यात चर्चेची लाट उसळली आहे. ५ जुलै रोजी मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानादरम्यान हा मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रसिद्ध गायिका आणि मराठी अस्मितेचा अभिमान असलेल्या आशा भोसले यांची प्रतिक्रिया माध्यमांद्वारे समोर आली आहे.
आर. डी. बर्मन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका सांगीतिक कार्यक्रमात आशा भोसले सहभागी झाल्या होत्या. तिथे पत्रकारांनी त्यांना शिवसेना-मनसेच्या मोर्चा आणि ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्रित राजकारणाबद्दल विचारलं. आशा भोसले यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर देत म्हटलं, “मला राजकारणातले फक्त आशिष शेलार माहिती आहेत. मला बाकी कोणतंही राजकारण माहिती नाही आणि ते मला नकोच आहे.”
त्यांच्या या उत्तराने अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला असला तरी, त्यांच्या विधानाचा सूचक संदर्भ अनेकांकडून घेतला जात आहे. आशा भोसले आणि मंगेशकर कुटुंबीयांचे ठाकरे कुटुंबाशी पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या प्रश्नावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे अनेकांचे लक्ष होते.
दरम्यान, ठाकरे बंधूंनी आगामी मोर्चात एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने केवळ भाषिक अस्मितेचा मुद्दा नाही तर भविष्यातील राजकीय समीकरणे देखील चर्चेत आली आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनी “जे महाराष्ट्राच्या मनात आहे, तेच होईल” असं वक्तव्य केलं होतं. तर राज ठाकरे यांनी “५ जुलैला सगळं स्पष्ट होईल,” असं सांगून भविष्यातील घडामोडींची झलक दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संबंधात म्हटलं आहे की, “राज आणि उद्धव ठाकरे हे मनाने आधीच एकत्र आले आहेत.” मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही मोर्चाच्या भूमिकेला दुजोरा देत सांगितलं, “या सरकारने महाराष्ट्रावर हिंदी लादू नये. मराठी भाषेचं अस्तित्व जपण्यासाठी हे एकत्रित पाऊल गरजेचं आहे.”
५ जुलै रोजी निघणारा मोर्चा केवळ भाषेच्या मुद्द्यावर आधारित असल्याचं जरी सांगितलं जात असलं तरी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे भविष्यातील राजकीय युतीचं संकेत ठरू शकतं. कारण, दोन्ही नेत्यांनी याआधी अनेक वेळा मराठी अस्मितेसाठी आवाज उठवला आहे, मात्र त्यांच्या राजकीय मार्गांनी ते वेगवेगळे गेले होते.
अशा वेळी आशा भोसले यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाकडून येणारी प्रतिक्रिया माध्यमांमध्ये नक्कीच चर्चेचा विषय ठरते. त्यांनी जरी स्पष्टपणे राजकारणापासून दूर राहण्याचं सांगितलं असलं तरी, त्यांच्या वक्तव्यामुळे आशिष शेलार यांचं नाव अचानक चर्चेत आलं आहे. आशिष शेलार हे सध्या भाजपमधील महत्त्वाचे नेते असून मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रात त्यांची सक्रिय भूमिका आहे.
एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार याची उत्सुकता, दुसरीकडे भाषिक आंदोलन आणि तिसरीकडे कलाविश्वातील प्रतिक्रिया या सगळ्या घडामोडींनी महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलेलं आहे. त्यामुळे ५ जुलैचा मोर्चा केवळ सामाजिक विषयापुरता मर्यादित राहतो की तो एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात ठरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.