Assembly Monsoon 2025: नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनात दुसऱ्याच दिवशी गोंधळ
महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनात दुसऱ्याच दिवशी गोंधळ; राजदंडाला हात लावल्यामुळे नाना पटोले दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबित
सायली मेमाणे
मुंबई : १ जुलै २०२५ : 📌 Assembly Monsoon Session 2025: विधीमंडळाच्या दुसऱ्या दिवशीच नाना पटोले निलंबित; नेमकं झालं काय?
महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस गदारोळात गेला. काँग्रेसचे नेते व आमदार नाना पटोले यांना विधानसभेत राजदंडाला हात लावल्याच्या कारणावरून दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. सभागृहात शेतकरीविरोधातील वादग्रस्त वक्तव्यांवरून प्रचंड गोंधळ झाला.
आज (1 जुलै) विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री संजय बनसोडे आणि आमदार अभिमन्यु पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नाना पटोले यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्यांचा मुद्दा उपस्थित केला.
नाना पटोले यांनी सांगितले की, “या दोन्ही नेत्यांनी सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करणारी विधाने केली आहेत. ‘मोदी तुमचा बाप असेल, पण शेतकऱ्यांचा नाही’ अशा प्रकारच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा शेतकरी चुप बसणार नाहीत.”
या वक्तव्यांनंतर सभागृहात गोंधळ उडाला आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांच्या भाषेवर आक्षेप घेतला. त्यांनी पटोलेंना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, पटोले अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला.
या कृतीमुळे सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, “नाना पटोले हे स्वतः विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत. राजदंडाच्या पवित्रतेबाबत त्यांना पूर्ण कल्पना आहे. तरीसुद्धा त्यांनी अशी कृती केली याचे आश्चर्य वाटते. मला कारवाई करायला भाग पाडू नका.”
या पार्श्वभूमीवर, काँग्रेस आमदार नाना पटोले यांना संपूर्ण दिवसासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले. यामुळे विधानसभेतील वातावरण तापले असून, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच असे वाद आणि निलंबन झाले असल्यामुळे आगामी अधिवेशनात आणखी वादग्रस्त घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शेतकरी प्रश्न, अपमानकारक वक्तव्ये आणि सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.