Baramati Crime: पुरंदर विमानतळाच्या नावाखाली शेतकऱ्यांची मोठी फसवणूक; ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Baramati Crime: पुरंदर विमानतळाच्या नावाखाली शेतकऱ्यांची मोठी फसवणूक; ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Baramati Fraud प्रकरणात पुरंदर विमानतळाच्या नावाखाली शेतकऱ्यांना गंडा घालून जेसीबी व ट्रॅक्टर लंपास करणाऱ्या टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला असून ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे २० जानेवारी २०२५: बारामती तालुक्यातील सुपा पोलिसांनी पुरंदर विमानतळाच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्याने ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे. सासवड परिसरात सुरू असलेल्या पुरंदर विमानतळाच्या कामाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर भाड्याने घेऊन त्यांची परस्पर विक्री केल्याचा हा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सुपा पोलिसांनी आरोपी निलेश थोरात याला अटक केली असून सुमारे ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लक्ष्य केले होते. “सासवड येथे नव्या विमानतळाचे काम सुरू असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जेसीबी आणि ट्रॅक्टरची गरज आहे,” असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. बी.जी. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर करारनामा करण्यात आला. दरमहा एक लाख रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवत शेतकऱ्यांकडून जेसीबी आणि ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले.
मात्र प्रत्यक्षात या वाहनांचा विमानतळाच्या कामासाठी कोणताही वापर करण्यात आला नाही. आरोपींनी संगनमताने ही वाहने वेगवेगळ्या ठिकाणी विकून टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीत अजय संतोष चव्हाण, दिनेश भाऊराव मोरे, निलेश अण्णा थोरात आणि तुषार शहाजी शिंदे यांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी शेतकरी बालाजी गोविंदराव गादेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपी निलेश थोरात याच्याकडून नांदेड जिल्ह्यातील तीन जेसीबी, धाराशिव जिल्ह्यातील दोन ट्रॅक्टर तसेच कळंब पोलीस स्टेशन गुन्ह्यातील एक ट्रॅक्टर असा एकूण तीन जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे ७७ लाख रुपये इतकी आहे. आरोपीला अटक करून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिस कोठडीत असताना आरोपीने आणखी धक्कादायक कबुली दिली आहे. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांना फायनान्स कंपनीचे ट्रॅक्टर असल्याचे खोटे सांगून ट्रॅक्टर विक्री केल्याचीही माहिती त्याने दिली आहे. त्यामुळे या फसवणुकीचे धागेदोरे आणखी जिल्ह्यांपर्यंत पसरले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी यांच्यासह सुपा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. या घटनेमुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही मोठ्या प्रकल्पाच्या नावाखाली होणाऱ्या व्यवहारांमध्ये अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information