Baramati News: PDCC बँकेत रात्री उशिरापर्यंत हालचाली, पैसे वाटपाचा आरोप; माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत तणाव

0
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत PDCC बँकेत रात्री ११ वाजेपर्यंत हालचाली

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत PDCC बँकेत रात्री ११ वाजेपर्यंत हालचाली

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत PDCC बँकेत रात्री ११ वाजेपर्यंत हालचाली, पैसे वाटप व शासकीय यंत्रणा वापरल्याचा आरोप; बारामतीत वातावरण तापले.

सायली मेमाणे

बारामती १९ जून २०२५ : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीस काही दिवस उरले असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘सहकार बचाव पॅनल’चे रंजन तावरे यांनी PDCC बँकेत रात्री ११ वाजेपर्यंत हालचाल सुरू असल्याचा गंभीर आरोप केला असून, बँकेत पैसे वाटपाच्या हालचाली होत असल्याचा दावा केला आहे. खास बाब म्हणजे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उमेदवार आहेत आणि त्यांनी याआधी आपणच चेअरमन होणार असल्याचे जाहीर केले आहे.

रंजन तावरे यांनी माध्यमांसमोर सांगितले की, PDCC बँकेत अर्ध्या रात्रीपर्यंत काही व्यक्ती उपस्थित होत्या आणि बँकेत पैसे भरले जात असल्याचे त्यांना पाहायला मिळाले. त्यांचा आरोप आहे की, अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी देखील घटनास्थळी उपस्थित होते. तावरे यांच्या मते, या ठिकाणी कारखान्याच्या सभासदांची आणि त्यांच्या नातेवाईकांची नावे असलेल्या याद्या तयार केल्या जात होत्या, ज्या नंतर निवडणूक प्रभावासाठी वापरण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

या आरोपांमध्ये आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे शासकीय यंत्रणेचा कथित गैरवापर. इरिगेशन विभागाचे अधिकारी डुबल यांच्यावर पाणी वितरण संस्थांवर दबाव टाकल्याचा आरोप तावरे यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, डुबल यांनी पाणी न मिळण्याची धमकी देत निवडणुकीसाठी मदतीस भाग पाडले, आणि हे सर्व उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार घडत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना PDCC बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे म्हणाले की, बँक साडेपाच वाजता बंद होते. मात्र एका फोनवरून ते स्वतः बँकेत आले आणि संगणीकरणाचे काम सुरू असल्यामुळे काही कर्मचारी दुसऱ्या मजल्यावर उपस्थित होते. मात्र, माळेगाव साखर कारखान्याच्या याद्या बँकेत कशा सापडल्या याबाबत ते स्पष्टता देऊ शकले नाहीत.

ही संपूर्ण घटना निवडणुकीपूर्वीच्या राजकीय धुमश्चक्रीचे उदाहरण ठरत असून, बारामतीतील साखर राजकारण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे. निवडणुकीचा मतदान दिवस जसजसा जवळ येतो आहे, तसतशी आरोपांची तीव्रता आणि संशयाचे ढग अधिकच गडद होत आहेत.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed