Bihar Election 2025 : महाआघाडी जिंकल्यास तेजस्वी यादवच मुख्यमंत्री होणार, काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांची घोषणा
काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांची घोषणा
Bihar 2025 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी तेजस्वी यादव हेच महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपवरही त्यांनी जोरदार टीका केली.
सायली मेमाणे
बिहार २८ जून २०२५ : बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी महाआघाडीतील मुख्यमंत्री पदासंदर्भातील गोंधळावर भाष्य करत थेट तेजस्वी यादव यांचं नाव स्पष्टपणे घेतलं आहे. राष्ट्रीय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना कन्हैया कुमार यांनी म्हटलं की, महाआघाडीत मुख्यमंत्री कोण होणार यावर कोणताही संभ्रम नाही. आरजेडी ही सर्वात मोठी पार्टी आहे आणि तेजस्वी यादव हेच महाआघाडीचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे जर निवडणुकीत महाआघाडीला यश मिळालं, तर मुख्यमंत्रीपदावर तेजस्वी यादवच विराजमान होतील, हे स्पष्ट आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचे नाव स्पष्ट होणे ही निवडणूक रणनीतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब मानली जात आहे. त्यात काँग्रेसकडूनही तेजस्वी यादव यांचं नाव मान्य केलं जातंय, हे आरजेडीसाठी राजकीय स्थैर्याचं लक्षण समजलं जातंय.
या वेळी कन्हैया कुमार यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी भाजपवर आरोप करताना म्हटलं की, भाजपने नितीश कुमार यांच्यासोबत सत्ता सामायिक केली असली तरी संधी मिळताच त्यांना बाजूला सारून आपला नेता मुख्यमंत्रीपदावर बसवण्याची तयारी आहे. भाजपची ही जुनाट रणनीती आहे की आधी प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करायची आणि मग त्यांना हळूहळू संपवायचं. त्यामुळे भाजपवर विश्वास ठेवणं धोक्याचं आहे, असं त्यांनी सूचित केलं.
कन्हैया कुमार यांनी सांगितलं की, या वेळेस बिहारमध्ये परिवर्तनाची लाट आहे. 2020 च्या निवडणुकीत बालाकोट स्ट्राईक हा मोठा प्रचाराचा मुद्दा होता. मात्र यावेळी भाजपकडून ऑपरेशन सिंदूर यावर फारसा भर दिला जात नाही, कारण जनतेला आता या गोष्टींच्या राजकारणाची जाणीव आहे. ही राष्ट्राभिमानाशी जोडलेली बाब आहे आणि यावर राजकारण केलं तर जनतेला ते खपणार नाही.
त्यांनी हेही स्पष्ट केलं की, महाआघाडीत जरी आरजेडी सर्वात मोठा पक्ष असला तरी काँग्रेस, डाव्या पक्ष आणि विकासशील इंसान पार्टीसारख्या घटक पक्षांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. गाडी चालवण्यासाठी केवळ क्लचच नव्हे, तर ब्रेक आणि रिअर व्ह्यू मिररही तितकेच गरजेचे असतात, असं सांगत त्यांनी सर्व घटक पक्षांची भूमिका अधोरेखित केली.
2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत आरजेडीने 75 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपने 74, जेडीयूने 43, काँग्रेसने 19 आणि डाव्या पक्षांनी 16 जागा मिळवलेल्या होत्या. त्या वेळी एनडीएने सत्ता राखत नितीश कुमार यांना सातव्यांदा मुख्यमंत्री बनवलं होतं. आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसकडून असा दावा करण्यात येतो आहे की, यंदा बिहारमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणूक ऑक्टोबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता असून, त्यासाठी महाआघाडी आणि एनडीए दोघंही जोरदार तयारी करत आहेत. मात्र महाआघाडीच्या स्पष्ट नेतृत्वामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण होतोय, असं राजकीय विश्लेषक मानतात.