BMC Election 2026: मुंबईचा महापौर कोण? नव्या सर्व्हेने राजकीय गणितं बदलली; अमराठी-मुस्लिम मतदार ठरणार किंगमेकर
BMC Election 2026: मुंबईचा महापौर कोण? नव्या सर्व्हेने राजकीय गणितं बदलली; अमराठी-मुस्लिम मतदार ठरणार किंगमेकर
मुंबई महापालिका निवडणूक 2026 पूर्वी समोर आलेल्या नव्या सर्व्हेने राजकीय खळबळ उडवली आहे. मराठी, अमराठी आणि मुस्लिम मतदारांचा कौल महापौरपदाचा फैसला ठरवणार आहे.
पुणे 0७ डिसेंबर २०२६ : मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 चे बिगुल वाजले असून, देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा महापौर कोण होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता एक नवा सर्व्हे समोर आला असून, त्यातील आकडेवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या सर्व्हेमुळे महापौरपदाची लढत किती चुरशीची होणार आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
मुंबईचा महापौर मराठीच होणार, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर हा महायुतीचा, हिंदू आणि मराठीच असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मतदारांचा नेमका कौल कोणाकडे झुकतोय, याचे चित्र समोर आले आहे. AsceIndia या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार, यंदाही मुंबईत सुमारे 55 टक्क्यांच्या आसपास मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, जी 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत साधारण समान आहे.
या सर्व्हेमधील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे मराठी मतदारांमध्ये जवळपास समान विभागणी दिसून येते. ठाकरे बंधूंच्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेकडे जवळपास निम्मे मराठी मतदार झुकताना दिसत आहेत. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीलाही मोठा मराठी पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. आकडेवारीनुसार महायुतीला 42 टक्के मराठी मते, तर ठाकरे-मनसे युतीला 44 टक्के मराठी मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांचा मराठी मतांमधील वाटा तुलनेने कमी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, या निवडणुकीत अमराठी मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. सर्व्हेनुसार तब्बल 53 टक्के अमराठी मतदार भाजप आणि शिवसेना महायुतीच्या बाजूने असल्याचे दिसते. हा पाठिंबा महायुतीसाठी मोठा गेमचेंजर ठरू शकतो. त्याउलट ठाकरे बंधूंच्या शिवसेना-मनसे युतीला केवळ 15 टक्के अमराठी मते मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला सुमारे 19 टक्के अमराठी मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो.
मुस्लिम मतदारांच्या कलाचा विचार केला, तर येथे काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला 41 टक्के मुस्लिम मते मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे-मनसे युतीला 28 टक्के, तर भाजप-शिवसेना महायुतीला केवळ 11 टक्के मुस्लिम मते मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच मराठी मते मोठ्या प्रमाणावर ठाकरे बंधूंमध्ये विभागलेली, अमराठी मते महायुतीकडे आणि मुस्लिम मते प्रामुख्याने काँग्रेसकडे झुकलेली दिसत आहेत.
या सर्व गणितांचा एकत्रित विचार करता, मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार, हे शेवटच्या टप्प्यातील मतदान आणि युती-आघाडींच्या रणनीतीवर अवलंबून राहणार आहे. अमराठी आणि मुस्लिम मतदारांचा कौल कुठल्या दिशेने वळतो, यावरच अंतिम निकाल ठरणार असून, त्यामुळेच या निवडणुकीला “किंगमेकर” मतदारांची निवडणूक असे संबोधले जात आहे. 16 तारखेला मतमोजणी झाल्यानंतरच मुंबईच्या राजकारणातील हे मोठे कोडे उलगडणार आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information