Chhatrapati Sambhajinagar : मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई! अमेरिकन नागरिकांना कॉल करून फसवणूक; 180 जण ताब्यात
मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई! अमेरिकन नागरिकांना कॉल करून फसवणूक; 180 जण ताब्यात
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी चिखलठाणा भागातील बोगस कॉल सेंटरवर मध्यरात्री धाड टाकली. अमेरिकन नागरिकांना फसवणुकीचे कॉल करणाऱ्या या रॅकेटमधून 180 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरणाची माहिती.
सायली मेमाणे
पुणे २८ ऑक्टोबर २०२५ : छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत चिखलठाणा परिसरातील एका बोगस कॉल सेंटरवर धाड टाकली आहे. या कारवाईत तब्बल १८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात मेघालय, नागालँड आणि सिक्कीम राज्यातील तरुण-तरुणींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर गेल्या वर्षभरापासून गुप्तपणे सुरू होते. कॉल सेंटरच्या आत पडदे लावून अत्यंत गोपनीय पद्धतीने हे केंद्र चालवले जात होते. रात्री साडेसहा वाजल्यापासून सकाळपर्यंत येथे काम चालायचे. या दरम्यान हाय-प्रोफाइल गाड्यांमधून कर्मचारी आत येत असत. या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना फसवणुकीचे कॉल केले जात होते. ‘अमेझॉनचे गिफ्ट व्हाऊचर जिंकलं आहे’ या आमिषाखाली लोकांकडून त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेतली जात होती. या माहितीच्या आधारे आरोपींनी कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या ठिकाणी काम करणाऱ्या तरुण-तरुणींना दरमहा २५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जात होता. बहुतांश आरोपी ईशान्य भारतातील राज्यांतून आलेले असून त्यांना या फसवणुकीसाठी खास प्रशिक्षण देण्यात आलं होतं. कॉल सेंटरमधून अत्याधुनिक संगणक प्रणाली, सर्व्हर आणि इंटरनेटद्वारे अमेरिकन नागरिकांच्या डेटाबेसशी संपर्क साधला जात होता. फसवणुकीचे कॉल ‘टेक सपोर्ट स्कॅम’ आणि ‘अमेझॉन गिफ्ट कार्ड फ्रॉड’ या प्रकारात मोडतात.
ही इमारत मुळ्ये नावाच्या व्यक्तीची असून ते एमआयडीसीमध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याचे समजते. त्यांच्या मुलांनी कंपनी सुरू करण्याच्या उद्देशाने ही जागा घेतली होती. मात्र, दोन्ही मुले परदेशात गेल्यानंतर ही इमारत इतरांना भाड्याने देण्यात आली. त्याचाच गैरफायदा घेत हा बोगस कॉल सेंटरचा रॅकेट उभारण्यात आला.
या धाडीसाठी पोलिसांनी १०० हून अधिक अधिकाऱ्यांचा मोठा ताफा तैनात केला होता. रात्री उशिरा ही कारवाई पार पडली आणि पहाटेपर्यंत तपास सुरूच होता. पोलिसांनी सर्व संगणक, सर्व्हर, मोबाईल उपकरणे आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. प्राथमिक तपासात या रॅकेटद्वारे परदेशातील शेकडो लोकांची फसवणूक झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. काही आरोपींनी प्राथमिक चौकशीत महत्त्वाची माहिती दिल्याचे कळते. सायबर पोलिस विभागाने या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू केला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही या फसवणुकीचा मागोवा घेण्यात येत आहे.
ही कारवाई राज्यातील सर्वात मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणांपैकी एक मानली जात आहे. पोलिस अधिकारी सांगतात की, या प्रकारच्या बोगस कॉल सेंटरमुळे भारताची सायबर सुरक्षा प्रतिमा धोक्यात येते. त्यामुळे यापुढे अशा केंद्रांवर देखरेख वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणात गुंतलेल्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.