Chhattisgarh Naxalites Surrender: 200+ माओवादी शस्त्रसह आत्मसमर्पण
Chhattisgarh Naxalites Surrender: 200+ माओवादी शस्त्रसह आत्मसमर्पण
छत्तीसगडमध्ये आज ऐतिहासिक दिवस! 208 माओवादी शस्त्रांसह आत्मसमर्पण, नॉर्थवेस्ट सब झोनल कमांडर रुपेश आणि माढ डिव्हिजन प्रमुख राणिता यांचा समावेश. मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा उपस्थित.
सायली मेमाणे
पुणे १७ ऑक्टोबर २०२५ : छत्तीसगडसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. जगदलपूर येथे 208 माओवादी नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे. यात 98 पुरुष असून, या सर्वांनी मुख्य प्रवाहात परतण्याचे निर्णय घेतले आहेत. आत्मसमर्पण सोहळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला.
नॉर्थवेस्ट सब झोनल ब्युरो प्रमुख असलेला माओवादी कमांडर रुपेश आणि माढ डिव्हिजन प्रमुख राणिता या आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादींच्या यादीत प्रमुख नावे आहेत. 21 मे रोजी छत्तीसगढ येथील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात पोलीस चकमकीत नंबाला केशवराजू उर्फ बसवराज यांच्या मृत्यूनंतर माओवादी कॅडरमध्ये मानसिक हादरा बसला होता. मात्र एप्रिलपासून रुपेश केंद्र सरकारसोबत शस्त्रसंधी आणि शांती वार्ता व्हावी या विचारांची मांडणी करत होता आणि भूपतीच्या भूमिकेचे समर्थन केले होते.
रुपेश याच्याकडे नक्षलवाद्यांच्या भरती, संयोजन आणि प्रचार विभागाचे दायित्व होते. काही महिन्यांपूर्वी त्याने पत्र लिहून आत्मसर्पणाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्याचे रँकमध्ये प्रमोशन करण्यात आले, तरी त्याने शस्त्रे ठेवण्याचा निर्णय घेतला.
गेल्या दोन दिवसांत छत्तीसगड येथील जंगलातून हाती किंवा खांद्यावर बंदुकी घेऊन बाहेर पडत असलेल्या माओवादी कॅडरची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. डोंगर टेकड्या आणि घनदाट जंगलांच्या पार्श्वभूमीवर झाडांच्या गर्दीतून माओवादी कॅडर रांगेत बाहेर निघताना दिसत आहेत. यात महिलांचा देखील समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेला ‘नक्षलवादाविरुद्धच्या लढाईतील एक ऐतिहासिक दिवस’ असे वर्णन केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, “अबूझमाड आणि उत्तर बस्तर, जी एकेकाळी नक्षलवादाची तळे होती, ती आज नक्षलवादी दहशतीपासून मुक्त झाल्या आहेत. नक्षलवादाचा थोडासा अंश केवळ दक्षिण बस्तरमध्ये शिल्लक आहे, तोही सुरक्षा दलांकडून लवकरच पुसला जाईल.”
या आत्मसमर्पणामुळे छत्तीसगडमधील नक्षलवाद विरुद्धची लढाई मोठ्या यशाने पुढे जात आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी शस्त्रांसह मुख्य प्रवाहात परतल्यामुळे राज्यातील सुरक्षा परिस्थिती सुधारेल आणि स्थानिक नागरिकांसाठी शांतता आणण्यास मदत होईल.
छत्तीसगडमधील हा ऐतिहासिक आत्मसमर्पण सोहळा नक्षलवादाविरुद्धच्या प्रयत्नांमध्ये एक मोठा टप्पा ठरला आहे, ज्यामुळे राज्यातील हिंसाचार कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.