Coldrif Cough Syrup Ban: महाराष्ट्रात कोल्ड्रीफ सिरपच्या विक्रीवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात कोल्ड्रीफ सिरपच्या विक्रीवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Coldrif Cough Syrup मध्ये डायइथिलीन ग्लायकोलसारखा विषारी पदार्थ आढळल्याने महाराष्ट्रात विक्रीवर बंदी. औषध मे 2025–एप्रिल 2017 बॅच मेडिकलमध्ये असल्यास टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्रात कोल्ड्रीफ कफ सिरपच्या विक्रीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या औषधामध्ये विषारी घटक आढळल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, कोल्ड्रीफ सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकोल हा हानिकारक घटक आढळला असून यामुळे गंभीर परिणाम होत आहेत. इतर काही राज्यांमध्ये या सिरपच्या सेवनामुळे बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
कोल्ड्रीफ कफ सिरप हे औषध तामिळनाडूतील कांचीपुरम येथे असलेल्या स्रेसन फार्मा या कंपनीत तयार करण्यात आले आहे. त्याच्या एस.आर. 13 समूहातील उत्पादनात विषारी घटक असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीची कारवाई करत या औषधाच्या विक्री, वितरण आणि वापरावर बंदी घातली आहे.
सदर औषध मे 2025 ते एप्रिल 2017 या कालावधीत तयार झाले असल्यास त्याचा साठा अजूनही राज्यातील मेडिकलमध्ये आहे का याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून मोहीम राबवली जात आहे. जर हा साठा कुठेही आढळला, तर नागरिकांनी आणि विक्रेत्यांनी तात्काळ टोल फ्री क्रमांक 1800 222 365 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रीफ सिरपमुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर महाराष्ट्र सरकार अधिक सतर्क झाली असून कोणत्याही परिस्थितीत हे औषध रुग्णांपर्यंत पोहोचू नये, यासाठी औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. विक्रेते, वितरक आणि रुग्णालय यांना औषधाचा साठा आढळल्यास त्याचे त्वरित वितरण थांबवून तो सुरक्षित पद्धतीने गोठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. औषधातील विषारी घटकाचा परिणाम गंभीर स्वरूपाचा असल्याने कोल्ड्रीफ सिरप तातडीने परत घेण्यात यावे आणि विक्री पूर्णतः थांबवली जावी, असा ठोस निर्णय घेण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर त्यांच्या घरी किंवा मेडिकलमध्ये या कालावधीतील कोल्ड्रीफ सिरप उपलब्ध असेल, तर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. तसेच, ते औषध वापरणे किंवा इतरांना देणे टाळावे. महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या आरोग्यासाठी ही कडक पावले उचलली असून प्रशासन सर्व स्तरावर या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करत आहे.