Dombivli News: कल्याण–डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई; वैतागलेल्या दिव्यांग वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
कल्याण–डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई; वैतागलेल्या दिव्यांग वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न

कल्याण–डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई; वैतागलेल्या दिव्यांग वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न

कल्याण–डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात पाणीटंचाईचा कळस; 76 वर्षीय दिव्यांग वृद्धाने आत्महत्येचा प्रयत्न. नागरिक आक्रमक, आमदार राजेश मोरे यांनी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

सायली मेमाणे

७ ऑक्टोबर २०२५ : कल्याण–डोंबिवली परिसरातील पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले असून एमआयडीसी निवासी भागांमध्ये अनेक दिवसांपासून एक थेंबही पाणी न आल्याने नागरिक संतापले आहेत. या पाणीटंचाईचा कळस असा की, डोंबिवलीतील गुरुदेव सोसायटीमध्ये राहणाऱ्या 76 वर्षीय दिव्यांग काशीनाथ सोनावणे यांनी वैतागून आपल्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. पाण्याच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेल्या निराशेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला होता. मात्र उपस्थिती बुद्धी दाखवत अनिल शिंदे या तरुणाने धाव घेत त्यांना समजावून सुरक्षित खाली आणले आणि त्यांचा जीव वाचवला.

एमआयडीसी परिसरातील पाणी पुरवठा गेले आठ दिवस पूर्णपणे ठप्प झाला आहे. अनेक इमारतींमध्ये अंघोळ, स्वयंपाक किंवा पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण त्रस्त झाले आहेत. बालकांपासून दिव्यांग नागरिकांपर्यंत प्रत्येकाला या गंभीर परिस्थितीचा फटका बसत आहे. पाणी नसल्याने मूलभूत गरजा भागवणे अशक्य होत असून नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रात्रीपासून रांगा लावण्याची वेळ आली आहे.

नागरिकांनी यापूर्वी एमआयडीसी कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या होत्या; मात्र अधिकाऱ्यांनी ‘पाईपलाईन तपासतो’, ‘बदल करतो’, ‘पुरवठा सुरू होईल’ अशा थातूरमातूर आश्वासनांवर नागरिकांना थांबवले. प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. पाणी नसल्यामुळे घरगुती कामे, स्वच्छतेचे प्रश्न, शाळा–कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारी अडचण, या सर्वांनी नागरिकांची सहनशीलता संपली आहे.

या तणावपूर्ण परिस्थितीत आमदार राजेश मोरे यांनी पाणीटंचाईबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांची तातडीने भेट घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत सूचित केले की हा प्रश्न आणखी वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. बैठकीदरम्यान नागरिकांनी आमदारांसमोर थेट रोष व्यक्त केला. “आम्हाला आठ दिवस पाणी नाही, पण याच भागातील टँकर माफियांना मुबलक पाणी मिळते. हे कसे शक्य? आमचा पाणी पुरवठा बंद आणि टँकर मात्र चालू?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. टँकर माफिया आणि स्थानिक पाणी वितरणातील अनियमिततेबद्दलही त्यांनी तक्रारी नोंदवल्या.

आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की गेल्या महिन्याभरापासून 27 गावांसह पिसवली, देशमुख होम, गोळवली, दावडी आणि रिजेन्सी परिसरामध्ये गंभीर पाणीटंचाई आहे. अमृत योजनेचे काम सुरू असले तरी सध्याची परिस्थिती तातडीच्या उपायांची मागणी करते. दिवाळीनंतर एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला असून पुरवठा का कमी झाला, याची पारदर्शक माहिती नागरिकांना दिली गेली नाही. त्यामुळे गैरसमज आणि रोष अधिक वाढत आहे.

बैठकीनंतर आमदार मोरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, गुरुवारपर्यंत पाणी समस्या दूर झाली नाही तर ते पुन्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडक देणार आहेत. नागरिकांनाही त्यांनी आश्वासन दिले की या प्रश्नावर गंभीर पातळीवर पाठपुरावा केला जाईल.

दिव्यांग वृद्धाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न हा या गंभीर परिस्थितीचा धोकादायक संकेत आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेअभावी नागरिक मानसिक तणावात जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. एमआयडीसी प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिक आता ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी करत आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed