Dussehra Melave 2025: मुंबईत वाहतूक बदल आणि NO Entry रस्त्यांची यादी
Dussehra Melave 2025: मुंबईत वाहतूक बदल आणि NO Entry रस्त्यांची यादी
दसरा मेळाव्यानिमित्ताने मुंबईत वाहतुकीत मोठे बदल; स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, केळुस्कर रोड, एम. बी. राऊत मार्ग यांसह काही रस्त्यांवर NO Entry लागू. पर्यायी मार्गांची माहिती वाचा.
सायली मेमाणे
पुणे ३० सप्टेंबर २०२५ : मुंबईत दसरा मेळावे येत आहेत, त्यानिमित्त शहरातील वाहतुकीवर महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत मोठ्या संख्येने गाड्यांचा ओघ असण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी खबरदारी घेऊन शहरातील अनेक मार्गांवर वाहने उभी राहण्यास व प्रवेशास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटांचे मेळावे शहरात आयोजित करण्यात येत आहेत. या मेळाव्यांमध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज आहे.
अंधेरी, दादर आणि शिवाजी पार्क परिसरात स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, केळुस्कर रोड (दक्षिण व उत्तर), एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग, एन. सी. केळकर मार्ग आणि एल. जे. रोडसह अनेक रस्त्यांवर वाहन उभे राहणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. वाहनांसाठी काही मार्गांवर पूर्ण प्रवेश बंदी आहे, तर काही मार्गांवर पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करावा लागणार आहे. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन) यावर वाहनांना प्रवेश बंदी असून, पर्यायी मार्ग म्हणून एस. के. बोले रोड, आगार बाजार, पोर्तुगीज चर्च आणि गोखले रोड वापरण्याचा सल्ला दिला आहे.
राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्कर रोड उत्तर जंक्शनपर्यंत वाहतुकीस बंदी असून, एल. जे. रोड आणि गोखले रोड-स्टिलमॅन जंक्शनचा पर्यायी मार्ग वापरण्याचे निर्देश आहेत. दिलीप गुप्ते मार्ग व पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनीस प्रवेश बंद आहे; या मार्गासाठी राजा बडे जंक्शनपासून एल. जे. रोड हा पर्यायी मार्ग आहे. गडकरी चौक येथून केळुस्कर रोड (दक्षिण व उत्तर) वरही वाहने प्रवेश करू शकणार नाहीत आणि पर्यायी मार्ग म्हणून एम. बी. राऊत मार्ग वापरण्याची शिफारस आहे.
दसरा मेळावे मुंबईत दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. रामायणातील राम आणि रावण तसेच देवी दुर्गा आणि महिषासुर यांच्या विजयाची आठवण करून देणारा हा सण लोकांसाठी आनंदाचा असतो, परंतु शहरातील वाहतुकीवर मोठा प्रभाव पडतो. प्रशासनाने गर्दी लक्षात घेऊन योग्य ती तयारी केली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवास करणे आवश्यक आहे.
या सर्व बदलांमुळे मुंबईतील नागरिकांना वाहतूक व्यवस्थापन सोपे व्हावे, तसेच दुर्घटना टाळता यावी, यासाठी पोलिसांनी तातडीचे पावले उचलली आहेत. सार्वजनिक वाहनांचा वापर करून प्रवास करणे, वेळेवर निघणे आणि पर्यायी मार्गांचा वापर करणे या दिवशी महत्त्वाचे ठरेल. प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार नागरिकांनी आपली सुरक्षितता आणि सुविधा लक्षात ठेवून प्रवास करणे आवश्यक आहे.