GST Revision: केंद्र सरकारच्या नवीन GST बदलांचा तुमच्यावर काय होणार परिणाम? जाणून घ्या!
केंद्र सरकारच्या नवीन GST बदलांचा तुमच्यावर काय होणार परिणाम?
GST मध्ये केंद्र सरकारचे नवीन आरोग्य आणि स्वच्छ ऊर्जा उपकर सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम करणार आहेत. GST स्लॅबमध्येही मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
सायली मेमाणे
पुणे ३ जुलै २०२५ : GST सुधारणा प्रस्तावामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार असून आरोग्य आणि स्वच्छ ऊर्जा उपकर नव्याने लागू होणार आहेत.
देशात लागू असलेल्या वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने यासाठी दोन नव्या उपकरांची आखणी केली आहे — एक ‘आरोग्य उपकर’ आणि दुसरा ‘स्वच्छ ऊर्जा उपकर’. याचा थेट परिणाम सिगारेट, कोल्ड्रिंक्स, लक्झरी कार आणि कोळसा यासारख्या वस्तूंवर होणार आहे. सध्या जीएसटीमध्ये समाविष्ट असलेल्या 28 टक्के स्लॅबवरील तंबाखूजन्य आणि साखरयुक्त पेयांवर आता अतिरिक्त आरोग्य उपकर लागू होऊ शकतो. सरकारचा हेतू लोकांना आरोग्यास हानिकारक पदार्थांपासून दूर ठेवण्याचा आहे, तसेच या करांमधून केंद्र सरकारला अतिरिक्त महसूल मिळवता येणार आहे.
स्वच्छ ऊर्जा उपकराचा परिणाम प्रदूषण करणाऱ्या इंधनांवर आणि लक्झरी वाहनांवर होणार असून यामागे सरकारचा उद्देश हरित ऊर्जेला चालना देणे आहे. यामुळे कोळशावर अवलंबन कमी होईल आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. या दोन्ही उपकरांमुळे थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर भार पडणार आहे.
या प्रस्तावात आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे 12% जीएसटी स्लॅब रद्द करण्याची योजना. यामुळे काही उत्पादने 5% स्लॅबमध्ये जातील आणि काही 18% स्लॅबमध्ये समाविष्ट होतील. टूथपेस्टसारख्या वस्तूंच्या दरात घट होऊ शकते. सरकारला यामुळे सुरुवातीला ५० हजार कोटी रुपयांचा महसुली फटका बसू शकतो. मात्र, यामुळे वापर वाढेल आणि कर संकलनही वाढण्याची शक्यता असल्याने सरकार सकारात्मक आहे.
सरकारी आकडेवारीनुसार जून महिन्यात GST संकलनात 6.2% वाढ झाली असून त्याचा आकडा 1.85 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मे महिन्यात GST संकलन 2.01 लाख कोटी होते, तर एप्रिलमध्ये तो 2.37 लाख कोटी रुपयांवर गेला होता. या संकलनाच्या वाढत्या आकड्यांमुळे केंद्र सरकार नव्या प्रस्तावित उपकरांसह GST धोरणात बदल करू इच्छित आहे.