HSRP न लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई! 18 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दंडात्मक मोहीम
HSRP न लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई! 18 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दंडात्मक मोहीम
HSRP Plate Mandatory: महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट न लावलेल्या वाहनांवर 18 फेब्रुवारीपासून कडक कारवाई होणार आहे. एक कोटीहून अधिक वाहने अजूनही नियमबाह्य.
पुणे ०६ जानेवारी २०२६ : महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP न लावलेल्या वाहनांवर आता कडक कारवाई होणार आहे. राज्य परिवहन विभागाने 18 फेब्रुवारीपासून राज्यभर तपासणी आणि दंडात्मक कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
HSRP बसवण्याची अंतिम मुदत एक महिन्यापूर्वीच संपली आहे. यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, मात्र 31 डिसेंबर 2025 ही अंतिम डेडलाईन होती. त्यानंतरही कोणतीही सवलत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकार आता नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
HSRP प्लेट्स 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांसाठी अनिवार्य आहेत. डिसेंबर 2024 मध्ये प्रथम हा आदेश जाहीर करण्यात आला होता. मात्र, अद्यापही मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी या नियमाचे पालन केलेले नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात परिस्थिती विशेषतः चिंताजनक असल्याचे चित्र आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 24 लाख 28 हजार 589 वाहनांना HSRP बसवणे आवश्यक आहे. मात्र, यापैकी केवळ 8 लाख 57 हजार 209 वाहनांवरच HSRP बसवण्यात आले असून, हे प्रमाण अवघे 35 टक्के आहे. राज्यभर पाहता, तब्बल एक कोटीहून अधिक वाहने अद्यापही HSRP शिवाय रस्त्यावर धावत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
परिवहन आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, 31 डिसेंबरपूर्वी HSRP साठी नोंदणी केलेल्या वाहनधारकांना 15 दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. अशा वाहनांसाठी 18 फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा केली जाणार आहे. मात्र, ज्यांनी नोंदणीच केलेली नाही, अशा वाहनांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
तपासणीदरम्यान केवळ नंबर प्लेटपुरतीच चौकशी मर्यादित राहणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. वाहनचालकांकडून आरसी बुक, वाहन विमा, पीयूसी प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्सही तपासले जाणार आहेत. यापैकी कोणताही कागदपत्र नसल्यास अतिरिक्त दंड आकारला जाणार आहे.
दरम्यान, HSRP फिटमेंट केंद्रांनीही वाहनधारकांच्या निष्काळजीपणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा अपॉइंटमेंट घेऊनही वाहनधारक उपस्थित राहत नसल्याने तयार प्लेट्स पडून राहतात, आणि नंतर तात्काळ बसवण्याचा आग्रह धरला जातो, असे केंद्र चालकांनी सांगितले.
आता कारवाई अटळ असल्याने वाहनधारकांनी विलंब न करता HSRP बसवून घेण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. अन्यथा दंड, कागदपत्र तपासणी आणि पुढील कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information