दहावी परीक्षा 2026 अर्ज भरण्यास सुरुवात; 6 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची अंतिम मुदत
दहावी परीक्षा 2026 अर्ज भरण्यास सुरुवात; 6 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची अंतिम मुदत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च 2026 दहावी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2025 आहे.
सायली मेमाणे
पुणे १३ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. 15 सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, 6 ऑक्टोबर 2025 ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. यंदा सर्व अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होणार असून, विद्यार्थी थेट अर्ज न भरता आपल्या शाळेमार्फतच अर्ज करणार आहेत.
नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे यू-डायस प्रणालीतील पेन आयडीवरून संबंधित शाळा प्रमुखांकडून ऑनलाईन सादर केली जाणार आहेत. तर पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार परीक्षेस बसणारे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे प्रविष्ट होणारे विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in येथे अर्ज सादर करू शकतील. याबाबत शाळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांच्या अर्जांबाबत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्री-लिस्ट तयार करून ती विद्यार्थ्यांकडून पडताळून स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे.
शाळांनी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपला स्कूल प्रोफाईल अद्ययावत करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय तसेच शिक्षकांची माहिती अचूकपणे भरून मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळांच्या लॉगिनवर विद्यार्थ्यांची प्री-लिस्ट उपलब्ध होईल. या यादीत विद्यार्थी व पालकांनी दिलेली सर्व माहिती नीट तपासावी. त्यानंतर विद्यार्थ्यांची व पालकांची स्वाक्षरी घेतल्यानंतर संबंधित प्री-लिस्ट मुख्याध्यापकांच्या शिक्क्यासह सादर करणे आवश्यक आहे.
मंडळाच्या सूचनांनुसार, दहावीच्या सर्व अर्जांची प्रक्रिया ही डिजिटल पद्धतीनेच होणार आहे. यामुळे अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ होणार असल्याचे शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी थेट अर्ज न करता आपल्या शाळेमार्फतच अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच एसएससी अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या फेज-13 परीक्षेत देशभरातून तब्बल 29 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर आता राज्य मंडळाच्या दहावी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे. या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शाळांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.