IAS तुकाराम मुंढेंना क्लिन चिट; आमदार खोपडेंची बडतर्फीची मागणी फेटाळली
IAS तुकाराम मुंढेंना क्लिन चिट; आमदार खोपडेंची बडतर्फीची मागणी फेटाळली
नागपूर स्मार्ट सिटी व महापालिकेतील आरोपांप्रकरणी IAS तुकाराम मुंढेंना चौकशीत क्लिन चिट मिळाली असून आमदार कृष्णा खोपडेंची बडतर्फीची मागणी सरकारने फेटाळली आहे.
पुणे १३ डिसेंबर २०२५ : IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी अखेर त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांवर झालेल्या चौकशीत मुंढे यांना “क्लिन चिट” देण्यात आली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. यामुळे मुंढेंच्या बडतर्फीची मागणी करणाऱ्या आमदार कृष्णा खोपडे यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंढे हे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना काही निर्णयांवरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्या कार्यकाळात सफाई कर्मचाऱ्यांची बडतर्फी, कोविड काळात उभारण्यात आलेले तात्पुरते रुग्णालय आणि स्मार्ट सिटी अंतर्गत कंत्राटदारांना देण्यात आलेल्या देयकांवरून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. याशिवाय स्मार्ट सिटीमध्ये कार्यरत दोन महिला अधिकाऱ्यांनी दमदाटी केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन महापौर आणि विद्यमान आमदार संदीप जोशी यांनीही चौकशीची मागणी केली होती.
या प्रकरणात आमदार कृष्णा खोपडे यांनी सरकारकडे लक्षवेधी सूचना मांडत मुंढेंची पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांमार्फत चौकशी करून बडतर्फी करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारकडून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, दोन स्वतंत्र चौकशीत मुंढे निर्दोष ठरले आहेत. मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून मुंढे यांना कामकाजाचे अधिकार तत्कालीन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले होते आणि त्यास तत्कालीन मुख्यमंत्र्यांची मान्यता होती.
सरकारने विधानसभेत सांगितले की, स्मार्ट सिटीतील आर्थिक व्यवहारांबाबत आणि निर्णयप्रक्रियेबाबत सखोल चौकशी करण्यात आली असून त्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार आढळून आला नाही. त्यामुळे मुंढेंच्या राजीनाम्याची किंवा बडतर्फीची मागणी फेटाळण्यात आली आहे. मात्र, महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपांबाबत स्वतंत्र चौकशी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. राधिका रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी होत असून, येत्या महिनाभरात अहवाल सादर होण्याची अपेक्षा आहे. त्या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले.
या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, कडक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, विरोधकांकडून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तरीही, सध्याच्या घडीला चौकशी अहवालांच्या आधारे सरकारने मुंढेंना क्लिन चिट दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information