ICMR Report: 90% भारतीयांच्या आहारात प्रोटीनची कमतरता, जाणून घ्या घरगुती उपाय
90% भारतीयांच्या आहारात प्रोटीनची कमतरता, जाणून घ्या घरगुती उपाय
ICMR च्या अहवालानुसार 90% भारतीयांच्या जेवणात प्रोटीन कमी आहे. महागड्या सप्लिमेंटशिवाय घरगुती पदार्थातून प्रथिनांची कमतरता कशी भरून काढावी हे जाणून घ्या.
सायली मेमाणे
पुणे १४ जुलै २०२४ : ICMR च्या नव्या रिपोर्टनुसार 90% पेक्षा जास्त भारतीयांच्या रोजच्या जेवणात प्रथिनांची कमतरता आढळते. ही आकडेवारी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा ठरू शकते. आपल्या शरीरातील स्नायू, हाडे आणि त्वचेपासून ते इम्युनिटी सिस्टमपर्यंत सर्व काही प्रथिनांवर अवलंबून असते. परंतु बहुतेक भारतीयांचा आहार भात, पोळी, बटाटा यासारख्या कार्बोहायड्रेटवर केंद्रित असतो. प्रथिनांचे स्त्रोत – जसे की डाळी, भाज्या, दूध, पनीर, शेंगदाणे – याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. यामुळे शरीरातील पेशींची दुरुस्ती आणि आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक असलेली प्रथिने मिळत नाहीत.
ICMR च्या मते, एका प्रौढ व्यक्तीस दररोज आपल्या वजनाच्या प्रति किलो 0.8 ते 1 ग्रॅम प्रथिनांची गरज असते. म्हणजेच, 60 किलो वजनाच्या व्यक्तीस दररोज किमान 48 ते 60 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता आहे. परंतु प्रत्यक्षात सरासरी भारतीय फक्त 20-30 ग्रॅम प्रथिनेच घेत असतो. विशेषतः महिलांमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक कमी असते. ही स्थिती केवळ आरोग्याचाच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी प्रोटीन महत्त्वाचे असल्यामुळे वजन व्यवस्थापनासाठी देखील समस्या निर्माण करते.
खबरदारी घेतल्यास साध्या अन्नपदार्थांतून देखील पुरेसे प्रथिने मिळवता येतात. डाळ आणि भात एकत्र खाल्ल्यास शरीरास संपूर्ण प्रथिने मिळतात. एक वाटी डाळ-भातातून सरासरी 10 ते 12 ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. याशिवाय, पालक, मेथी, फुलकोबी, भेंडी अशा भाज्यांमधूनही 2 ते 3 ग्रॅम प्रथिने प्रति 100 ग्रॅम मिळू शकतात. जर तुम्ही दिवसभरात विविध भाज्यांचा समावेश केला, तर तुम्हाला 10-12 ग्रॅम अतिरिक्त प्रथिने मिळू शकतात.
शेंगदाणे, भाजलेले चणे, सोया चंक्स, टोफू, पनीर टिक्का हे पदार्थ स्वस्त असून प्रथिनांचा उत्तम स्रोत ठरतात. 30 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये 7 ग्रॅम, तर एका ग्लास दुधात 7 ग्रॅम प्रथिने असतात. याशिवाय, एका वाटी दह्यात 5-6 ग्रॅम प्रथिने मिळतात. दिवसाच्या जेवणात, नाश्त्यात किंवा मधल्या वेळेस हे पदार्थ नियमितपणे खाल्ले तर 15 ते 20 ग्रॅम अतिरिक्त प्रथिने सहज मिळवता येतात.
सर्वसामान्य लोकांसाठी पूरक आहार घेणे शक्य नसले, तरी प्रथिनांची गरज पारंपरिक आणि घरगुती जेवणातून पूर्ण करता येते. केवळ आहारात थोडेसे बदल करून आणि खाण्याच्या सवयी सुधारून, आपण आरोग्यदायी आणि प्रथिनयुक्त आहार घेऊ शकतो. प्रोटीन हा केवळ बॉडी बिल्डिंगसाठी नसून, संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक असतो हे विसरू नका.