Investment Scam & Sextortion: म्हाडाच्या निवृत्त अधिकाऱ्याला ‘काव्या शर्मा’ने गुंतवणूक आमिषात अडकवले; तब्बल 4 कोटींची फसवणूक
Investment Scam & Sextortion: म्हाडाच्या निवृत्त अधिकाऱ्याला ‘काव्या शर्मा’ने गुंतवणूक आमिषात अडकवले; तब्बल 4 कोटींची फसवणूक
मुंबईत म्हाडाच्या निवृत्त अभियंत्याला इंटरनॅशनल ट्रेडिंग स्कीमच्या नावाखाली गुंतवणूक फसवणूक व सेक्स्टॉर्शनद्वारे 4 कोटींना गंडा. वागळे इस्टेट पोलिसांत गुन्हा दाखल.
पुणे ०९ जानेवारी २०२६ : मुंबईत गुंतवणुकीवर अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून आणि त्यानंतर सेक्स्टॉर्शनद्वारे ब्लॅकमेल करत म्हाडाच्या एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल 4 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिसांनी ‘काव्या शर्मा’ नावाची महिला आणि तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तक्रारदार हा म्हाडाचा 62 वर्षीय निवृत्त अभियंता आहे. 17 जुलै 2025 रोजी त्यांना काव्या शर्मा नावाच्या महिलेचा व्हॉट्सॲप कॉल आला. सुरुवातीला मैत्री वाढवत विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ‘इंटरनॅशनल ट्रेडिंग स्कीम’मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.
आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित अधिकाऱ्याने जुलै 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने तब्बल 4 कोटी रुपये ट्रान्सफर केले. यासाठी त्यांनी पतपेढीतून 3 कोटी 95 लाख रुपयांचे कर्जही काढले होते. सुरुवातीला नफा मिळाल्याचे दाखवून अधिक गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले, अशी माहिती तक्रारीत नमूद आहे.
जेव्हा अधिकाऱ्याने आपली मूळ रक्कम आणि नफा परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपी महिलेने पैसे देण्यास टाळाटाळ केली. यानंतर प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. काव्या शर्माने पीडिताला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवण्यास सुरुवात केली आणि पैसे परत हवेत तर नग्न फोटो पाठवण्याची अट घातली. मानसिक तणावाखाली पीडित अधिकाऱ्याने काही फोटो पाठवले, ज्याचा नंतर ब्लॅकमेलसाठी वापर करण्यात आला.
25 जानेवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीने पीडित अधिकाऱ्याला फोन करून आपण काव्या शर्माचे काका असल्याचे सांगितले. पाठवलेल्या फोटोंच्या आधारे बलात्कार आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली. हे प्रकरण ‘सेटल’ करण्यासाठी आरोपींनी आणखी 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सततच्या आर्थिक लुटीला आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित अधिकाऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित बँक खात्यांचा तपास, डिजिटल व्यवहारांचे विश्लेषण आणि आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सायबर गुन्हे, गुंतवणूक फसवणूक आणि सेक्स्टॉर्शनच्या वाढत्या प्रकारांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information