JJ हॉस्पिटलमधून आधुनिक कूल्हा शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण; १५ वैद्यकीय महाविद्यालयांना प्रशिक्षण

0
JJ हॉस्पिटलमधून आधुनिक कूल्हा शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण

JJ हॉस्पिटलमधून आधुनिक कूल्हा शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण

मुंबईतील JJ हॉस्पिटलतर्फे आधुनिक कूल्हा शस्त्रक्रियांचे थेट प्रात्यक्षिक १५ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रसारित होणार आहे. अमेरिकेतील तज्ज्ञ डॉ. शिराज पटेल शस्त्रक्रिया करत थेट मार्गदर्शन करणार आहेत.

सायली मेमाणे

पुणे १० जुलै २०२५ : मुंबईतील भायखळ्यातील सर जेजे रुग्णालय आपल्या १८० व्या वर्धापन दिनानिमित्त वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात नवे पाऊल उचलत आहे. रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागाने शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, या उपक्रमातून राज्यातील अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना व सर्जनना थेट फायदा होणार आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणाचा थेट प्रक्षेपण १५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केला जाणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत २१ व २२ जुलै रोजी जेजे रुग्णालयात दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेवरील नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. अमेरिकेतील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. शिराज पटेल स्वतः या कार्यशाळेत सहभागी होऊन थेट शस्त्रक्रिया करून आधुनिक पद्धतीचे शिक्षण देतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय डॉक्टरांना नव्या आणि स्नायू वाचवणाऱ्या तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळणार आहे. ही शस्त्रक्रिया लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे महाराष्ट्रातील १५ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दाखवण्यात येणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक पाहून शिकण्याची संधी मिळेल.

या उपक्रमात जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, अधीक्षक डॉ. संजय सुरासे, ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. नादिर शाह यांचे नेतृत्व असून वरिष्ठ निवासी डॉ. रजत शेट्टी, डॉ. प्रियांका मीना, डॉ. कुशल गोहिल आणि डॉ. संतोष घोटी यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे.

डॉ. नादिर शाह यांनी सांगितले की, जुन्या पद्धतीनुसार हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया नितंबांमधून केली जात होती, ज्यामुळे काहीवेळा गुंतागुंत वाढत असे. मात्र, आता अत्याधुनिक आणि शरीराला कमी त्रासदायक पद्धती उपलब्ध झाल्याने रुग्ण लवकरात लवकर बरे होतात. यामुळे प्रशिक्षणाद्वारे देशभरातील सर्जनना नवीन कौशल्ये आत्मसात करता येतील आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा अमूल्य अनुभव मिळेल.

हा उपक्रम राज्य शासनाच्या आरोग्य शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पा मानला जात असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमधील गुणवत्ता व कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. शिक्षण, प्रयोग, आणि प्रत्यक्ष सर्जिकल अनुभव यांचे हे त्रिसूत्री मॉडेल राज्यात पहिल्यांदाच राबवले जात असून, पुढील काळात अशाच प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम इतर शाखांमध्येही राबवले जाण्याची अपेक्षा आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed