Kalyan Bicycle Travel: 15 सायकलस्वारांचा कल्याण ते उटी ऐतिहासिक प्रवास; आठवड्यात 1200 किमी सायकलिंगचा निर्धार
Kalyan Bicycle Travel: 15 सायकलस्वारांचा कल्याण ते उटी ऐतिहासिक प्रवास; आठवड्यात 1200 किमी सायकलिंगचा निर्धार
Kalyan Bicycle Travel News: सायकलिस्टबद्दल आदर व रस्त्यावरील सुरक्षिततेचा संदेश देत कल्याणमधील 15 सायकलस्वारांचा 1200 किमीचा कल्याण ते उटी सायकल प्रवास सुरू.
०४ जानेवारी २०२६ : सायकलिंग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रभावी संदेश देणारे माध्यम ठरत आहे. याच संदेशाला अधिक व्यापक स्वरूप देत कल्याणमधील 15 सायकलस्वारांनी कल्याण ते उटी असा तब्बल 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास सुरू केला आहे. सायकलिस्टबद्दल समाजात आदर निर्माण करणे आणि रस्त्यावरील त्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून या सायकल प्रवासाला सुरुवात झाली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील आणि उपआयुक्त संजय जाधव यांच्या उपस्थितीत या सायकलस्वारांना अधिकृतपणे फ्लॅगऑफ करण्यात आले. या सायकल रॅलीत डॉक्टर, वकील तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिकांचा सहभाग असून सायकलिंगच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
ही सायकल रॅली कल्याण, पुणे, पंढरपूर, विजयपूरा, चित्रदुर्ग, म्हैसूर, मदुमलई जंगलमार्गे गुडलूर आणि अखेरीस उटी असा प्रवास करणार आहे. एका आठवड्यात सुमारे 1200 किलोमीटरचे अंतर पार करत ही रॅली पूर्ण होणार असून हा प्रवास चढाईच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक मानला जात आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास दहा हजार फूट उंचीपर्यंत जाणारा हा मार्ग सायकलस्वारांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची मोठी कसोटी पाहणारा आहे.
कल्याणमधील ‘बाईकपोर्ट’ या सायकलिस्ट संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. याआधी गोवा, दिल्ली, हैद्राबाद तसेच महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमधील दीर्घ सायकल प्रवास या संस्थेने यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. दिल्लीनंतरचा हा दुसरा सर्वात लांबचा टप्पा असून चढाईच्या दृष्टीने आतापर्यंतचा सर्वात कठीण प्रवास असल्याची माहिती बाईकपोर्ट सायकलिंग क्लबच्या प्रमुख डॉ. रेहनुमा यांनी दिली.
या सायकल रॅलीमध्ये चंद्रभान साबळे, आनंद जाधव, हितेन राणे, मनोज चौगुले, राकेश कुमार, पवन, दर्शन वाकचौरे, मिलिंद देशमुख, अलतमाश शेख, अमित मोरे, साहिर शेख, डॉ. रेहनुमा, सारंग दळवी, गिरीश राव, संदीप अत्रे, रमेश पालटी, अनुप रॉय आणि पुरुषोत्तम करंबेळकर यांचा सहभाग आहे. सर्व सायकलस्वार उत्साहाने आणि ठाम निर्धाराने हा प्रवास पूर्ण करण्यासाठी निघाले आहेत.
सायकलिस्टबद्दलचा आदर आणि त्यांच्या सुरक्षिततेचा संदेश हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे रस्त्यांवरील सायकलस्वारांची सुरक्षितता हा मोठा प्रश्न बनला आहे. सायकलिंगमुळे प्रदूषण कमी होते, आरोग्य सुधारते आणि मानसिक तणाव कमी होतो, त्यामुळे सायकलिस्टकडे केवळ छंद म्हणून न पाहता समाजासाठी योगदान देणारे घटक म्हणून पाहिले जावे, असा संदेश या रॅलीद्वारे देण्यात येत आहे.
या उपक्रमातील सदस्य प्रतिक गरवारे यांनी सांगितले की, सायकलिस्टनीदेखील स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हेल्मेट, रिफ्लेक्टर, लाईट्स यांचा वापर करून सुरक्षित सायकलिंग करणे आणि वाहनचालकांनी सायकलस्वारांना योग्य सन्मान देणे, हा या रॅलीचा सामाजिक संदेश आहे. कल्याण ते उटी हा प्रवास केवळ अंतर पार करण्याचा नसून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा एक प्रयत्न ठरणार आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information