Kalyan News : कल्याणच्या जुळ्या बहिणींचा डबल सीए यश! ईशा आणि ईशदाने एकत्र मिळवले घवघवीत यश
कल्याणच्या जुळ्या बहिणींचा डबल सीए यश!
कल्याणच्या ईशा आणि ईशदा दामले या जुळ्या बहिणींनी एकाच वेळी CA परीक्षेत यश मिळवत कुटुंबाचा मान वाढवला. हार न मानता चिकाटीने साधले यश. वाचा संपूर्ण कथा.
सायली मेमाणे
कल्याण ७ जुलै २०२५ : कल्याण शहरातून एक प्रेरणादायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. लोकग्राम परिसरातील दामले कुटुंबातील ईशा आणि ईशदा या जुळ्या बहिणींनी एकाच वेळी चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भालचंद्र आणि दीप्ती दामले यांची ही दोन्ही कन्या लहानपणापासूनच अभ्यासू होत्या. त्यांच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी विशेष कष्ट घेतले. वडील भालचंद्र दामले हे बँकेत नोकरी करत होते आणि नुकतेच निवृत्त झाले. आई दीप्ती दामले अणुऊर्जा क्षेत्रातील अभियंता असून त्यांनी मुलींच्या अभ्यासासाठी नोकरीचा राजीनामा दिला. 2020 मध्ये बारावीच्या परीक्षेत ईशाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता (98.07%), तर ईशदालाही 93% गुण मिळाले होते. दोघीही कॉमर्स शाखेत अग्रेसर राहिल्या.
सीए होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी पदवी शिक्षणासोबतच सीए परीक्षेची तयारी सुरू ठेवली. एकत्र अभ्यास करताना त्यांनी एकमेकींच्या शंका सोडवल्या आणि परस्पर सहकार्याने ही वाटचाल केली. नोव्हेंबर 2024 मध्ये दिलेल्या परीक्षेत ईशा एका ग्रुपमध्ये उत्तीर्ण झाली, तर ईशदाला अपयश आलं. मात्र त्यांनी हार मानली नाही. मे 2025 मध्ये दोघींनी पुन्हा परीक्षा दिली आणि यावेळी ईशाने दुसऱ्या ग्रुपमध्ये यश मिळवलं, तर ईशदाने एकाच वेळी दोन्ही ग्रुप्स क्लिअर करत डबल यश मिळवलं.
या दोघींनी त्यांच्या यशाचं श्रेय चिकाटी, एकमेकांचे सहकार्य आणि पालकांचा संपूर्ण पाठिंबा यांना दिलं. “ही वाट सोपी नव्हती, पण चिकाटी आणि आई-वडिलांचा संपूर्ण पाठिंबा यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो,” असं दोघी बहिणींनी नम्रपणे सांगितलं. त्यांच्या या कष्टाला आता देशातील सर्वोत्तम व्यावसायिक डिग्रीने सन्मानित केलं गेलं आहे.
ईशा आणि ईशदा या केवळ जुळ्या नाहीत, तर परस्पर प्रेरणास्थानही ठरल्या आहेत. त्यांचं यश हे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरणार आहे. अशा जिद्दी आणि मेहनती विद्यार्थिनींच्या वाटचालीला पुढील काळात मोठे यश लाभो, हीच शुभेच्छा!