कांदिवलीत गटांमध्ये विट, बॅट आणि हॉकी काठ्यांनी राडा; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
कांदिवलीत गटांमध्ये विट, बॅट आणि हॉकी काठ्यांनी राडा; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
मुंबईच्या कांदिवली परिसरात यादव आणि चौहान गटांमध्ये विट, बॅट आणि हॉकी काठ्यांनी भीषण राडा झाला. घटनेत एकाचा मृत्यू, अनेक जखमी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
सायली मेमाणे
पुणे ८ सप्टेंबर २०२५ : राजधानी मुंबईत गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. ताज्या घटनेत कांदिवली परिसरात दोन गटांमध्ये झालेला राडा मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. विट, बॅट, हॉकी काठ्या, दगड आणि रॉड यांचा वापर करून झालेल्या या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
ही घटना कांदिवलीतील लालजी पाडा पोलीस चौकीपासून काही अंतरावर घडली. यादव आणि चौहान या दोन गटांमध्ये आधीपासूनच वाद सुरू असल्याचे समजते. रविवारी रात्री उशिरा या वादाने हिंसक रूप धारण केले आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. हाणामारीदरम्यान विटा, दगड, बॅट आणि हॉकी काठ्यांचा बेछूट वापर करण्यात आला. त्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली. अनेक घरांच्या काचा फुटल्या तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तुटलेले साहित्य पडून होते.
या भीषण राड्यात एक युवक गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. तसेच अनेक लोकांना किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. सध्या आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.
कांदिवलीसारख्या गजबजलेल्या भागात विट, दगड आणि काठ्या वापरून होणारी अशी हाणामारी पाहून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे ही घटना पोलीस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर घडली असल्याने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटनांवर आळा घालावा आणि कायदा व सुव्यवस्था राखावी अशी मागणी केली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्यात दोन्ही गट एकमेकांवर बॅट, रॉड, हॉकी काठ्यांनी तुटून पडताना दिसत आहेत. एका गटाने विटांचा पाऊस पाडल्याचे स्पष्टपणे व्हिडिओत दिसून येते. पोलिसांनी सध्या या व्हिडिओच्या आधारे गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.
मुंबईतील वाहतूक, गृहनिर्माण आणि दैनंदिन जीवनशैलीसोबत अशा गुन्हेगारी घटना वारंवार घडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे. या घटनेनंतर कांदिवली परिसरात तणावाचे वातावरण असून अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.