KL Rahul Record: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा ऐतिहासिक विक्रम, दिग्गजांचे विक्रम मोडून रचला नवा इतिहास

0
इंग्लंडमध्ये केएल राहुलचा ऐतिहासिक विक्रम

इंग्लंडमध्ये केएल राहुलचा ऐतिहासिक विक्रम

KL राहुलने इंग्लंडमध्ये कसोटीत तिसरे शतक झळकावून इतिहास रचला. गावस्करनंतर SENA देशांमध्ये सर्वाधिक शतक करणारा सलामीवीर ठरला.

सायली मेमाणे

२४ जून २०२५ : लीड्स – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज केएल राहुलने भेदक खेळी करत क्रिकेट इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. भारताच्या दुसऱ्या डावात राहुलने 137 धावांची खेळी करत कसोटीतील नववे शतक झळकावले आणि भारताला 364 धावांच्या मजबूत आघाडीपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला. या ऐतिहासिक खेळीमुळे केएल राहुलने इंग्लंडच्या भूमीवर एकाच वेळी अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.

राहुलचे हे इंग्लंडमधील तिसरे कसोटी शतक ठरले असून, इंग्लंडमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक कसोटी शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी या यादीत सुनील गावस्कर, रवी शास्त्री, विजय मर्चंट आणि राहुल द्रविड यांचा समावेश होता, ज्यांनी प्रत्येकी दोन शतके झळकावली होती. राहुलने त्यांचा विक्रम मागे टाकत इतिहास रचला आहे.

इतकेच नव्हे तर, राहुलने तीन विविध देशांमध्ये सलामीवीर म्हणून ५ वा शतक ठोकत गावस्करनंतर हा विक्रम करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या भारतीय सलामीवीरांच्या यादीत राहुल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सुनील गावस्करने येथे ८ शतके केली असून, आता राहुलने ५ शतकांबरोबर त्याच्या जवळ जाण्याचा इशारा दिला आहे.

SENA देशांमध्ये सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या आशियाई सलामीवीरांमध्ये राहुल आता दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने पाकिस्तानच्या सईद अन्वरला (४ शतके) मागे टाकले आहे. संपूर्ण SENA देशांमध्ये भारतीय फलंदाजांकडून सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर असून त्यांनी १७ शतके झळकावली आहेत. त्यानंतर विराट कोहली (१२), राहुल द्रविड (१०), गावस्कर (८) आणि आता राहुल (६) यांचा क्रम आहे.

सामन्याच्या घडामोडी पाहता, केएल राहुलसह ऋषभ पंतने देखील दुसऱ्या डावात 118 धावांची जबरदस्त खेळी करत आठवे कसोटी शतक पूर्ण केले. राहुल आणि पंतने मिळून 195 धावांची भागीदारी करत इंग्लंडपुढे 371 धावांचे अवघड लक्ष्य उभे केले. दिवसअखेरीस इंग्लंडने 21 धावांवर दोन विकेट गमावल्या असून, ते अजूनही 350 धावांनी पिछाडीवर आहेत.

ही कामगिरी केएल राहुलच्या कसोटी कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरली असून, त्यांच्या फलंदाजीतील परिपक्वता आणि सातत्य भारताच्या आगामी परदेश दौऱ्यांसाठी आश्वासक आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *