Lonavala Election: पेरू विकणाऱ्या ताई नगरसेविका! संघर्षाला मतदारांची साथ; भाग्यश्री जगताप यांचा दणदणीत विजय
Lonavala Election: पेरू विकणाऱ्या ताई नगरसेविका! संघर्षाला मतदारांची साथ; भाग्यश्री जगताप यांचा दणदणीत विजय
Lonavala Nagar Parishad Election Result: फळ विकून कुटुंब चालवणाऱ्या भाग्यश्री जगताप प्रभाग 11अ मधून विजयी; पैशांवर मात करत लोकशाहीचा प्रेरणादायी विजय.
पुणे २२ डिसेंबर २०२५ : राजकारणात पैसा, सत्ता आणि प्रभाव यांचा बोलबाला असतो, अशी सर्वसाधारण धारणा असताना लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीने लोकशाहीचे खरे सौंदर्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. रोज पेरू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भाग्यश्री महादेव जगताप यांनी प्रभाग क्रमांक 11अ मधून दणदणीत विजय मिळवत नगरसेविका म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला आहे. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून संघर्ष, प्रामाणिकपणा आणि मतदारांच्या विश्वासाचा विजय मानला जात आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल जाहीर होताच अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. काही प्रभागांमध्ये बिनविरोध निवडी झाल्या, तर काही ठिकाणी चुरशीच्या लढतींनी राजकीय वातावरण तापले. मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिली ती भाग्यश्री जगताप यांची निवडणूक लढत. सामान्य कुटुंबातून आलेल्या, कोणताही मोठा राजकीय वारसा नसलेल्या आणि रोज फळ विक्री करून संसार चालवणाऱ्या महिलेला मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला.
भाग्यश्री जगताप या गेल्या दहा वर्षांपासून लोणावळा शहरात पेरू विक्रीचा व्यवसाय करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत थेट उमेदवारी दिली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपला रोजचा व्यवसाय न थांबवता प्रचाराची जबाबदारी स्वीकारली. सकाळी आणि दुपारी फळ विक्री करून घरखर्च भागवायचा आणि संध्याकाळी मतदारांच्या घरोघरी जाऊन संवाद साधायचा, असा त्यांचा संघर्षमय दिनक्रम होता.
प्रभाग क्रमांक 11अ मधून त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रचना विजय सिंनकर होत्या. ही लढत अटीतटीची ठरेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भाग्यश्री जगताप यांनी 1468 मते मिळवत 608 मतांनी स्पष्ट विजय मिळवला, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 800 मते मिळाली. या निकालाने पैसा, प्रचारयंत्रणा आणि मोठे राजकीय बळ यांपेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो, हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
आदिवासी समाजातील एका सामान्य कुटुंबातील महिलेला मिळालेली ही संधी आणि मतदारांनी दिलेला कौल, ही लोकशाहीची खरी ताकद मानली जात आहे. आपल्या विजयावर प्रतिक्रिया देताना भाग्यश्री जगताप म्हणाल्या की, हा विजय केवळ माझा नसून संविधानावर आणि मताच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचा आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
या विजयामुळे केवळ लोणावळा शहरातच नव्हे, तर संपूर्ण मावळ तालुक्यात भाग्यश्री जगताप यांच्या जिद्दीचे, कष्टाचे आणि संघर्षाचे कौतुक होत आहे. सामान्य माणसालाही राजकारणात संधी मिळू शकते आणि ती संधी मिळाल्यास तो प्रामाणिकपणे जनतेचे प्रतिनिधित्व करू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information