मनोर रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे तरुण आईचा मृत्यू; आमदार विलास तरे यांची चौकशी आणि कारवाईची मागणी

0
मनोर रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे तरुण आईचा मृत्यू; आमदार विलास तरे यांची चौकशी आणि कारवाईची मागणी

मनोर रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे तरुण आईचा मृत्यू; आमदार विलास तरे यांची चौकशी आणि कारवाईची मागणी

पालघर जिल्ह्यातील मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचाराऐवजी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला “दुसरीकडे घेऊन जा” सांगून डॉक्टरांनी हात वर केले. प्रिती जाधव यांच्या मृत्यू प्रकरणात आमदार विलास तरे यांनी जबाबदार डॉक्टरांवर कडक कारवाई व चौकशीची मागणी केली.


सायली मेमाणे

पुणे ८ ऑक्टोबर २०२५ : पालघर : मनोर ग्रामीण रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणामुळे प्रिती जाधव (वय २२, धुकटण गाव) हिचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात संताप उसळला आहे. या घटनेची चौकशी करून जबाबदार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बोईसरचे आमदार विलास तरे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धुकटण येथील प्रिती जाधव हिला प्रसूतीसाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीदरम्यान तिची तब्येत बिघडल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचाराऐवजी “लवकर दुसरीकडे घेऊन जा” असे सांगून हात वर केले. या रुग्णालयात 108 ॲम्बुलन्स तातडीने उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे उपचार उशिरा सुरू झाले.

कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर मनाली कोकाटे आणि डॉक्टर प्रशांत राजगुरू यांनी रुग्णाला उपचार न देता फक्त बाहेरच्या इस्पितळात हलवण्याचा सल्ला दिला. गुजरातकडे रुग्णवाहिकेत जात असताना ऑक्सिजन सिलेंडर संपल्याने रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यात परत आली आणि नवा सिलेंडर घेतल्यानंतर पुन्हा प्रवास सुरू झाला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला आणि प्रितीचा रक्तस्त्रावामुळे रस्त्यातच मृत्यू झाला.

ही घटना ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि संवेदनशून्यता उघड करणारी आहे. या आधी सप्टेंबर महिन्यातही सर्पदंश झालेल्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे ही एक अपघाती नव्हे, तर प्रणालीगत निष्काळजीपणाची साखळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार विलास तरे म्हणाले की, “मनोर ग्रामीण रुग्णालय हे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आशेचे केंद्र असायला हवे होते, पण ते आता मृत्यूकेंद्र बनले आहे. येथे डॉक्टर व कर्मचारी केवळ हजेरी लावतात, जबाबदारी आणि रुग्णसेवेची भावना संपली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, रुग्णालयाला दरवर्षी कोट्यवधींचा निधी मिळतो, तरीही प्राणवायू, ॲम्बुलन्स आणि प्रसूती सुविधा या मूलभूत सेवांचा पुरवठा ठप्प आहे.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून डॉक्टर मनाली कोकाटे, डॉक्टर प्रशांत राजगुरू व संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 108 ॲम्बुलन्स सेवा आणि ऑक्सिजन पुरवठा प्रणालीतील दोषांचा शोध घेऊन जबाबदारांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असेही तरे यांनी सांगितले.

मृत प्रिती जाधव यांच्या कुटुंबाला किमान २५ लाख रुपयांची मदत आणि एका नातेवाईकाला सरकारी नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांची विशेष तपासणी मोहीम तातडीने राबवून भविष्यात अशा घटना टाळण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

ही घटना केवळ एका रुग्णाच्या मृत्यूपुरती मर्यादित नाही, तर ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील अपयश आणि प्रशासनिक निष्काळजीपणाचे प्रतीक असल्याचे आमदार विलास तरे यांनी म्हटले. त्यांनी या निमित्ताने मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर तातडीने सुरू करण्याचीही मागणी सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed