मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साही व्यापारी मेळा; उद्योजकतेला चालना

0
Banking News: RBI कडून कडक कारवाई; महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांसह चार संस्थांवर मोठा दंड

Banking News: RBI कडून कडक कारवाई; महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांसह चार संस्थांवर मोठा दंड


पुण्यातील मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्यापारी मेळ्यात 300 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; 75 हून अधिक स्टॉल्सद्वारे उद्योजकतेचा अनुभव.


पुणे 2४ जानेवारी २०२६ : पुणे शहरातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी मेळ्याने संपूर्ण महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. विद्यार्थ्यांमधील उद्योजकता, सर्जनशीलता आणि व्यावसायिक कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम नियमितपणे राबवला जात असून यंदाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या व्यापारी मेळ्यात सुमारे 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत तब्बल 75 पेक्षा अधिक स्टॉल्स उभारले होते.

या स्टॉल्सवर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली. कपडे, पर्यावरणपूरक उत्पादने, हस्तनिर्मित दागिने, गृहसजावटीच्या आकर्षक वस्तू, नावानुसार तयार केलेले आभूषण, गुलदस्ते, कृत्रिम फुले, पूजासाहित्य तसेच दैनंदिन वापरातील अनेक उपयुक्त वस्तू येथे उपलब्ध होत्या. यासोबतच खानपानाच्या स्टॉल्सनाही मोठी गर्दी पाहायला मिळाली. भेलपुरी, पाणीपुरी, वडा पाव, पुलाव, मोदक, पिझ्झा, बर्गर, चाट, सँडविच अशा विविध चविष्ट पदार्थांनी मेळ्याची रंगत वाढवली. काही ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या राज्यांतील पारंपरिक पदार्थांचे स्टॉल्स लावले होते, तर परदेशी विद्यार्थ्यांचाही या उपक्रमात सक्रिय सहभाग होता.

व्यापारी मेळ्यात फन फेअर गेम्सचाही समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी रंजक खेळ, कोडी आणि प्रश्नमंजुषा आयोजित केल्या होत्या. खेळ जिंकणाऱ्या किंवा सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येत होत्या. महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांनी या स्टॉल्सना भेट देत खरेदीचा आनंद घेतला. स्टॉल्सवरील गर्दीमुळे संपूर्ण परिसर खिळखिळा आणि उत्साही दिसत होता.

या व्यापारी मेळ्याचे उद्घाटन पहिल्या दिवशी सकाळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. शामकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मेळ्याच्या संयोजिका प्रा. मानसी ठाकुर, उपप्राचार्य, विविध विभागप्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते. उद्घाटनानंतर प्रा. देशमुख यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या उपक्रमांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये दिसणारी कल्पकता आणि व्यावसायिक दृष्टी त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली.

या दोन दिवसांच्या व्यापारी मेळ्यात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला. वस्तूंची मांडणी, किंमत ठरवणे, ग्राहकांशी संवाद, जाहिरात आणि विक्री या सर्व बाबींचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्टॉल्ससाठी स्वतंत्र जाहिरात पोस्टर्स तयार केले होते. आत्मविश्वासाने वस्तू विकताना हे विद्यार्थी भविष्यात मोठे उद्योजक होण्याची स्वप्ने पाहताना दिसत होते.

१३ जानेवारी रोजी व्यापारी मेळ्यात सहभागी झालेल्या सर्व स्टॉलधारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वाधिक आकर्षक आणि उपयुक्त स्टॉल्सना विशेष पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या नवसर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा हा व्यापारी मेळा निश्चितच यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed