मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य व्यापार मेळावा; उद्योजकतेला चालना
मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य व्यापार मेळावा; उद्योजकतेला चालना
पुण्यातील मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्यापार मेळाव्यात 300 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; 75 स्टॉल्स, खाद्यपदार्थ, हस्तकला व फन फेअरचा अनोखा अनुभव.
पुणे 2५ जानेवारी २०२६ : पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्वतःचे स्टॉल्स उभारले. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने राबवला जाणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव देणारा ठरत आहे.

यंदाच्या व्यापार मेळाव्यात सुमारे 300 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. एकूण 75 स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कपडे, पर्यावरणपूरक उत्पादने, आकर्षक दागिने, गृहसजावटीच्या वस्तू, नावावर आधारित आभूषण, गुलदस्ते, कृत्रिम फुले, पूजासाहित्य तसेच दैनंदिन वापरातील विविध उपयुक्त वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यासोबतच खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना मोठी गर्दी पाहायला मिळाली. भेलपुरी, पाणीपुरी, वडा पाव, पुलाव, मोदक, पिझ्झा, बर्गर, चाट, सँडविच यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थी आणि पाहुण्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.

या व्यापार मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वोत्तर भारतातील विद्यार्थ्यांनी उभारलेले विविध राज्यांच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. तसेच काही परदेशी विद्यार्थ्यांनीही या मेळाव्यात सहभाग घेतल्यामुळे या उपक्रमाला बहुसांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेसोबतच त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आणि विक्री कौशल्य येथे प्रकर्षाने दिसून आले.
व्यापार मेळाव्यात फन फेअर गेम्सचेही आयोजन करण्यात आले होते. काही स्टॉल्सवर कोडी, खेळ आणि मनोरंजक उपक्रम ठेवण्यात आले होते. खेळात सहभागी होणाऱ्या किंवा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येत होती. या सर्व उपक्रमांमुळे संपूर्ण महाविद्यालय परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
व्यापार मेळाव्याचे उद्घाटन पहिल्या दिवशी सकाळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. शामकांत देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यापार मेळाव्याच्या संयोजिका प्रा. मानसी ठाकुर, विविध शाखांचे उपप्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते. उद्घाटनानंतर प्राचार्यांनी सर्व स्टॉल्सना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या निर्मितीचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.
दोन दिवस चाललेल्या या व्यापार मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने आपली उत्पादने विकली आणि नफा देखील कमावला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्टॉल्ससाठी जाहिरात पोस्टर्स तयार केले होते. आत्मविश्वासाने व्यवसाय करताना हे विद्यार्थी भविष्यातील उद्योजक म्हणून घडताना दिसत होते. 13 जानेवारी रोजी व्यापार मेळाव्यात सहभागी स्टॉलधारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वात आकर्षक आणि उपयुक्त स्टॉल्सना पुरस्कार देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमशीलतेला चालना देणारा हा व्यापार मेळावा निश्चितच यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information